भाजप- शिंदे गटात वादाची ठिणगी; भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा खासदारांचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीला १० महिने बाकी असतानाच शिंदे गट आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. भाजपकडून आम्हाला सापत्न वागणूक दिली जात आहे असा थेट आरोप शिंदे गटाचे खासदार आणि जेष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी केला आहे. तसेच २२ जागा हा आमचा दावा नव्हे तर हक्काच्याच आहेत असेही त्यांनी म्हंटल.

प्रसामाध्यमांशी बोलताना गजानन कीर्तिकर म्हणाले , आम्ही सर्व खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहोत. आम्ही जे 13 खासदार आहोत ते आम्ही एनडीएचे घटक आहोत. यापूर्वी आम्ही एनडीएचा घटक पक्ष नव्हतो. पण आता आम्ही एनडीएचे घटक आहोत. त्यामुळे त्या पद्धतीने आमची कामे झाली पाहिजे. घटक पक्षाला दर्जा दिला पाहिजे. पण भाजपकडून आम्हाला सापत्न वागणूक मिळते असं आमचं म्हणणं आहे, असा आरोप गजानन कीर्तिकर यांनी केला आहे.

दरम्यान, शिंदे गट २२ लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार अशा चर्चा सुरु आहेत, शिंदे गटाने भाजपकडे २२ जागांचा दावा केला आहे अशाही बातम्या समोर येत होत्या त्यावर बोलताना आमच्या 22 जागा आहेत. दावा कशाला केला पाहिजे? असा उलट सवाल कीर्तिकर यांनी केला. 2019ला आम्ही शिवसेना – भाजप एकत्र लढलो. तेव्हा भाजपने 26 जागा घेतल्या होत्या. त्यावेळी भाजपचे तीन उमेदवार पडले. शिवसेनेच्या 22 जागा होत्या. त्यावेळी आमचे 18 खासदार निवडून आले होते. त्यातील चार उमेदवार पडले. त्यामुळे आम्ही 22 जागा लढणार आहोत. 22 जागा लढण्याची आमची तयारी आहे, असंही कीर्तिकर यांनी स्पष्ट केलं.