हॅलो महाराष्ट ऑनलाईन Ganeshotsav Free Toll Pass । गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना सरकारने गुड न्यूज दिली आहे. कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा संपूर्ण टोल माफ करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबतचा जीआर केला आहे. त्यामुळे गणेशभक्तांना जणू बाप्पाचं पावला असं म्हणावं लागेल. टोलमाफी साठी सरकार कडून मोफत टोलचा “गणेशोत्सव 2025 – कोकण दर्शन” हा पास देण्यात येणार आहे. तो पास तुम्हाला भरावा लागेल आणि आपल्या वाहनावर चिकटवा लागेल. नेमकी प्रोसेस काय असेल? हा पास कुठे मिळेल याबाबत आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देत आहोत.
काय आहे शासनाचा जीआर – Ganeshotsav Free Toll Pass
सरकारने आपल्या जीआर मध्ये म्हंटल आहे कि, आगामी सन २०२५ च्या गणेशोत्सव कालावधीत कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना गणेशोत्सव निमित्त पथकर (Toll) माफी व इतर सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार, २३/०८/२०२५ ते दि.०८/०९/२०२५ या कालावधीत मुंबई बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग (राम- ४८), मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग (राम-६६) वरील व इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर कोकणात जाणाऱ्या गणेशोत्सव भाविकांच्या वाहनांना तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसना पथकरातून सवलत (Ganeshotsav Free Toll Pass) देण्यात येत आहे.
पास कुठे मिळेल?
प्रवाशांना “गणेशोत्सव २०२५, कोकण दर्शन अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पासेस (Ganeshotsav Free Toll Pass) मिळतील, त्यावर गाडी क्रमांक, चालकाचे नांव असा मजकूर नमूद करुन ते स्टीकर्स गाडीवर लावावेत. हे पास संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO), पोलीस व वाहतूक विभागाकडे उपलब्ध असतील. महत्वाची बाब म्हणजे परतीच्या प्रवासासाठीदेखील याच पासचा उपयोग करता येईल. ग्रामीण व शहरी पोलीस तसेच प्रादेशिक परिवहन विभाग यांचा समन्वय साधून हे पास वेळेत वितरित करावेत, जेणेकरून भाविकांना प्रवासात कोणताही त्रास होऊ नये असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बसेस व इतर वाहने महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यातून येणार आहेत तेथील पोलीस खाते किंवा प्रादेशिक परिवहन खाते यांचेकडे पासेस वरील “अ” प्रमाणे उपलब्ध करुन देण्यात येतील. संबंधित जिल्हयातून गौरी-गणपती वाहतूकीसाठी रवाना होणाऱ्या सर्व बसेसना पथकर माफी असलेले पासेस संबंधित वाहनांस लावून / चिकटवून सदरच्या बसेस रवाना होतील असेही शासन आदेशात म्हंटल आहे.




