Gaur Attack : रानगव्याच्या हल्ल्यात वनमजूर गंभीर जखमी; सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील घटना; कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू

Gaur Attack
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gaur Attack: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बामणोली वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मालदेव नियतक्षेत्रात रानगव्याने केलेल्या हल्ल्यात वनमजूर गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. सुभाष तुकाराम गुरव (वय-४५) असे जखमी झालेल्या मजुराचे नाव आहे. गस्त घालत असताना अचानक समोर आलेल्या रानगव्याने त्यांच्यावर हल्ला केला. ही घटना शनिवार (दि.२०) दुपारी घडली.

रानगव्याने केलेल्या हल्ल्यात (Gaur Attack) गुरव यांच्या हाताला, पायाला व छातीला गंभीर इजा झाली आहे. वन विभागाने सुरुवातीला त्यांना उपचारासाठी साताऱ्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना कराड येथील कृष्णा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. यावेळी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक तुषार चव्हाण, उपसंचालक किरण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक बाबा हाके, वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बाठे, वनपाल संदीप पवार, प्रवीण मोरे, वनरक्षक गणेश भोरडे, आनंद मरागजे यांचे सहकार्य लाभले. वनविभागाकडून वन्यप्राण्यांच्या अधिवासात वावरताना कर्मचाऱ्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शासकीय मदतीची गरज- Gaur Attack

वनविभागाचे कर्मचारी वनाचे रक्षण करत असताना प्रसंगी आपला जीव धोक्यात घालत असतात. कालच्या घटनेवरून नुकतीच याची प्रचिती आली. दरम्यान गव्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या गुरव यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या घरची परिस्थिती ही अत्यंत हलाखीची आहे. यामुळे शासनाने त्यांना जास्तीत जास्त आर्थिक सहाय्य करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

सहकाऱ्यांचे धाडस-

मालदेव नियतक्षेत्रातील ही घटना अत्यंत थरारक आणि अंगावर शहारे आणणारी आहे. रक्तस्त्राव होत असलेल्या जखमी गुरव यांना पहिल्या काही तासांत उपचार मिळणे आवश्यक होते. कोणतीही आधुनिक साधनसामग्री उपलब्ध नसताना, केवळ जिद्दीच्या जोरावर आपल्या सहकाऱ्याला वाचवण्यासाठी वनरक्षक गणेश भोरडे, आनंद मरागजे यांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत.