महाबळेश्वर-मेढा मुख्य रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळला गवा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
महाबळेश्वर शहरापासून काहीच अंतरावर मेढा मुख्य रस्त्यावर माचूतर गणेश मंदिरानजीक गुरुवारी एक गवा जखमी अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पुणे येथील रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. टीमच्यावतीने गव्याला बेशुद्ध करुन प्रथमोपचार करण्यात आले. तसेच त्यास वाहनातून चांदोली अभयारण्यात नेण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्यावतीने देण्यात आली.

सातारा जिल्ह्यातील मेढा-महाबळेश्वर मार्गावरील माचूतर परिसरातील गुरुवारी स्थानिक ग्रामस्थांना एक गवा आढळून आला. गव्याच्या पायाला दुखापत झाल्याने तो लंगडत होता. यावेळी स्थानिकांनी व प्राणीमित्र रफिक नालबंद यांनी याबाबतची माहिती वनविभागास दिली. वनविभागाचे वनपाल सहदेव भिसे, वनरक्षक लहू राऊत, रोहित लोहार यांच्यासह सह्याद्री प्रोटेक्टर्सचे संदेश भिसे व सहकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जखमी गव्यास उपचारांची आवश्यकता असल्याने वनविभागाने पुणे येथील रेस्क्यू टीमला पाचारण केले. दुपारी ही टीम घटनास्थळी दाखल झाली. गव्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून प्रथम त्याला बेशुद्ध करुन प्रथमोपचार करण्यात आले. अधिक उपचारांसाठी गव्यास वाहनातून चांदोली अभयारण्यात नेण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक महेश झांझुर्णे, वनक्षेत्रपाल रंजनसिंह परदेशी यांच्या नेतृत्वाखाली या मदतकार्यात वनविभागाचे वनपाल सहदेव भिसे, वनरक्षक लहू राऊत, रोहित लोहार यांच्यासह सह्याद्री प्रोटेक्टर्सचे संदेश भिसे, देवेंद्र परदेशी, सचिन ढेबे, सचिन गुजर, साहिल सुतार, हर्ष साळुंखे, ओंकार पवार, प्रणित शिंदे, अशिष पवार, प्रथमेश पवार, प्रथमेश कोळी यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.