Gautam Gambhir : गौतम गंभीरचा राजकारणातून सन्यास; वरिष्ठांना दिले ‘हे’ कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gautam Gambhir : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवर आणि भाजप खासदार गौतम गंभीरने राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. याबाबत ट्विट करत गंभीरने भाजप अध्यक्ष जेपी नड्डा याना जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गंभीरने भाजपच्या तिकिटावर पूर्व दिल्लीतून निवडणूक लढवून विजय सुद्धा मिळवला होता. मात्र आता अचानकपणे राजकारणातून बाजूला होत गंभीरने सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

मी माननीय भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना विनंती केली आहे कि माझ्या राजकीय कर्तव्यातून मुक्त करा जेणेकरून मी माझ्या आगामी क्रिकेट वचनबद्धतेवर लक्ष केंद्रित करू शकेन. मला जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे मनापासून आभार मानतो.. जय हिंद! असं ट्विट गौतम गंभीरने (Gautam Gambhir) केलं आहे.

गंभीरचे तिकीट कापण्याची शक्यता होती? Gautam Gambhir

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप 100 हून अधिक खासदारांची तिकिटे कापण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.यामध्ये गौतम गंभीरचे तिकीट सुद्धा कापण्यात येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. भाजप पुन्हा एकदा गंभीरला तिकीट देण्याच्या मनस्थितीत नसल्याचे गेल्या अनेक दिवसांपासून बोललं जात होते. त्यातच आता भाजपकडून लोकसभा निवडणुकीची उमेदवार यादी जाहीर होण्यापूर्वीच गंभीरने राजकारणातून सन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत गौतम गंभीरने पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला होता. त्यावेळी त्याने काँग्रेसचे उमेदवार अरविंदर सिंग लवली यांचा ३,९१,२२२ मतांनी पराभव केला होता.