तो व्हिडिओ व्हायरल झाला अन् वाटलं सगळं संपलं.., अखेर गौतमी पाटीलने मौन सोडलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मध्यंतरी नृत्यांगना गौतमी पाटीलचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतर गौतमी पाटीलला अनेक टीकांना आणि बदनामीला सामोरे जावे लागले होते. आता या सर्व घटनेला बरेच दिवस उलटून गेल्यानंतर गौतमी पाटीलने माध्यमांशी बोलताना त्यावेळी ओढावलेल्या प्रसंगाविषयी भाष्य केले आहे. “तो एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मला वाटलं आता सगळं संपलं. आता थांबावं, लोकांना आपली प्रगती बघवत नाही म्हणून मग ते या पातळीपर्यंत जातात याचा धक्का बसला” अशी प्रतिक्रिया गौतमी पाटीलने दिली आहे.

गौतमी पाटीलचा एका कार्यक्रमाच्या ठिकाणी चेंजिंग रूम मधला व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओविषयी प्रतिक्रिया देताना गौतमी पाटील हिने म्हटले आहे की, “माझा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मला वाटलं होतं की आता थांबावं. मला अक्षरशः धक्का बसला होता. त्यावेळी मी घरात होते आणि प्रचंड घाबरले होते. त्यावेळी मी एकच विचार केला, सगळं संपलंय, आता थांबायचं. लोकांना आपली प्रगती बघवत नाही म्हणून लोक इथपर्यंत जातात का? पण मी थांबले तर त्यांच्या मनासारखं होणार, म्हणून मी नव्याने सुरूवात केली”

त्याचबरोबर, “मला सर्वात जास्त सपोर्ट हा महिलावर्गांकडून मिळाला. मी आज इथे आहे ते फक्त माझ्या चाहत्यांमुळेच. त्या घटनेनंतर मी स्टेजवर गेल्यानंतर त्यांनी मला जाणूनही दिले नाही की माझ्या सोबत असे काही घडले आहे. मला भिती वाटत होती की, समोरून मला रिस्पॉन्स कसा येईल, लोक काय बोलतील याची भीती वाटत होती. पण लोकांचे आभार, त्यांनी मला सांभाळून घेतलं. प्रेक्षकांनी साथ दिली नसती तर उभी राहू शकली नसते.” असे गौतमी पाटील हिने म्हटले आहे.

पुढे बोलताना गौतमी पाटील हिने डान्सच्या कार्यक्रमावर होणाऱ्या टीकेवर म्हणले की, “कधी कधी वाटतं की मी गरीब घराण्यातील आहे, म्हणून माझ्यावर टीका केली जाते. मला कुणाचा पाठिंबा नाही, माझ्यासोबत कुणाचा हात नाही सोबत म्हणून या गोष्टींना सामोरं जावं लागतं असं वाटतं. ज्यावेळी माझ्याकडून चूक झाली त्यावेळी मी माफी मागितली, आता व्यवस्थित करते तरीही हे असं होतंय. माझ्यासारखे अनेक कलाकार सिनेमापर्यंत गेले आहेत. पण त्यांच्यावर कुठेही बोललं जात नाही” अशा शब्दात गौतमी पाटील हिने आपले मत व्यक्त केलं आहे.