अर्थनगरी | योगेश जगताप
भारतीय वंशाच्या हार्वर्ड बिझनेस स्कुलमधील प्राध्यापिका गीता गोपीनाथ यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख आर्थिक सल्लागारपदी आज नेमणूक करण्यात आली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टीन लिगार्ड यांनी ही माहिती आज पत्रकार परिषदेत दिली. गीता गोपीनाथ या ४६ वर्षाच्या असून त्यांनी लेडी श्रीराम महाविद्यालय दिल्ली येथून अर्थशास्त्र या विषयात पदवी घेतली आहे. दिल्ली आणि वॉशिंग्टन येथून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून २००१ साली प्रिंस्टन विद्यापीठातून पीएचडी मिळवली आहे. २००५ सालापासून त्या हार्वर्ड विद्यापीठात अध्ययन करत आहेत.
अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांच्या समितीवर त्या सध्या कार्यरत आहेत. यामध्ये अमेरिकन इकॉनॉमिक रिव्ह्यू, नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्च, हँडबुक ऑफ इंटरनॅशनल रिसर्च या संस्थांचा उल्लेख करता येईल. आर्थिक धोरणे, भाववाढ, मुद्रित धोरण, रोजगार, सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्र अशा विविध विषयांवर ४० हुन अधिक आंतरराष्ट्रीय संशोधन पेपर त्यांनी प्रकाशित केले आहेत.
जगातील सर्वोत्कृष्ट अर्थशास्त्रज्ञांपैकी गीता एक आहे. विषयाचं उत्तम आकलन, प्रश्न सोडविण्याचं कौशल्य, चांगल्या पद्धतीने विकसित झालेले नेतृत्वगुण आणि दीर्घ आंतरराष्ट्रीय अनुभव यामुळे या पदासाठी ती सर्वार्थाने योग्य असल्याचं मत क्रिस्टीन लिगार्ड यांनी व्यक्त केलं. तिच्या निवडीने मला अतिशय आनंद झाल्याचंही पुढे त्या म्हणाल्या.