औरंगाबाद | जिल्हा परिषदेकडून जिल्हा वार्षिक योजनेमध्ये 116 नवीन अंगणवाड्यांकरिता दहा कोटींचा निधी मंजूर केला आहे, तसेच या इमारतींचे बांधकाम 9 महिन्यांत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत जिल्हाभरात भाड्याच्या घरात चालणाऱ्या अंगणवाड्यांना आता स्वतंत्र इमारती मिळणार आहेत.
खेड्या गावातील गरीब कुटुंबातील मुलांना लहान वयात सकस आहार मिळत नाही. यामुळे ग्रामीण भागातील मुले कुपोषित राहतात. बालक कुपोषित राहू नये म्हणुन शासनाने 1974 मध्ये बालवाडी सुरू केली होती. यानंतर 1998 मध्ये अंगणवाडीमध्ये त्यांचे रूपांतर करण्यात आले होते. त्याचबरोबर बालकांसोबत गरोदर महिला, किशोरवयीन मुली यांचीही काळजी घेतली जाऊ लागली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अंगणवाड्या या भाड्याच्या खोल्यांमध्ये सुुरू असल्याने नवीन इमारतींची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती.
जिल्हा परिषदेने आता 116 नवीन इमारती बांधण्याकरिता निधीला मंजूरी दिली आहे. यातील दहा अंगणवाड्यांसाठी 9 लाख 35 हजार, तर उर्वरित 106 अंगणवाड्यांसाठी प्रत्येकी 8 लाख 50 हजार रुपये मंजूर केले आहे. या इमारतींचे बांधकाम येत्या 31 मार्च 2022 पर्यंत करण्याचे पत्रकात नमूद आहे. यासाठी स्थळपाहणी अहवाल पॉसिटीव्ह येणे गरजेचे आहे. औरंगाबाद आणि फुलंब्री येथे 19, सिल्लोड 17, पैठण 8, वैजापूर 13, गंगापूर 13, खुलताबाद 11, कन्नड 13,सोयगाव 3 या ठिकाणी अंगणवाडी इमारती बांधण्यात येणार आहे.