गुलाम नबी आझाद यांच्याकडून नव्या पक्षाची घोषणा; दिले ‘हे’ नाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला रामराम ठोकलेल्या गुलाम नबी आझाद यांनी आज आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली. आझाद यांनी आपल्या नव्या पक्षाला डेमोक्रेटिक आझाद पार्टी असे नाव दिले आहे. आज जम्मू येथे पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी आपल्या नव्या पक्षाच्या झेंड्याचे अनावरणही केले.

पक्षाची विचारधारा आपल्या नावासारखी असेल आणि सर्व धर्मनिरपेक्ष लोक त्यात सामील होतील, असे आझाद यांनी म्हंटल. त्यांनी पक्षाचा अजेंडा आधीच स्पष्ट केला आहे. यामध्ये जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करणे, स्थानिक लोकांसाठी जमीन आणि नोकऱ्यांचे हक्क सुरक्षित करण्यासाठी संघर्ष सुरू ठेवणे इत्यादी गोष्टी आहेत. आपल्या नव्या पक्षाबाबत नावाबाबत गुलाम नबी म्हणाले की, उर्दू, संस्कृतमध्ये सुमारे 1,500 नावे आम्हाला पाठवण्यात आली होती. हिंदुस्थानी हे हिंदी आणि उर्दूचे मिश्रण आहे. पक्षाचे नाव लोकशाही, शांतताप्रिय आणि स्वतंत्र असावे अशी आमची इच्छा होती, म्हणून पक्षाला हे नाव देण्यात आलं असं त्यांनी म्हंटल.

यावेळी त्यांनी पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण केलं. ध्वजाच्या तीन रंगांविषयी माहिती देताना ते म्हणाले, मोहरीचा रंग विविधतेतील सर्जनशीलता आणि एकता दर्शवतो, पांढरा रंग शांतता दर्शवतो आणि निळा रंग स्वातंत्र्य, मोकळी जागा, कल्पनाशक्ती आणि समुद्राच्या खोलीपासून आकाशाच्या उंचीपर्यंतच्या मर्यादा दर्शवतो.

दरम्यान, गुलाम नबी आझाद यांनी २६ ऑगस्ट रोजी काँग्रेसला रामराम ठोकला. जवळपास पाच वर्ष ते काँग्रेसममध्ये होते. गांधी घराण्याच्या जवळचे अशीही त्यांची ओळख होती. मात्र सोनिया गांधी याना पत्र पाठवत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आणि पक्षातील सर्व पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यावेळी त्यांनी राहूल गांधी यांच्यावरही अपरिपक्व असल्याचा आरोप केला होता.