Monday, February 6, 2023

बाळासाहेब ठाकरेंनाही भारतरत्न पुरस्कार द्या; संजय राऊत यांची मागणी

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. आज बाळासाहेब ठाकरे यांचा १० वा स्मृतिदिन आहे, त्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राऊत बाळासाहेब ठाकरेंबद्दल भरभरून बोलले. यावेळी बाळासाहेबाना भारतरत्न का दिला नाही असा सवाल त्यांनी केंद्रातील मोदी सरकारला केला.

- Advertisement -

बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात आणि देशात जे काम केलं आहे त्यामुळे देशाला सदैव त्यांचे स्मरण केलं जाईल. माझ्यासारख्या माणसाने त्यांच्यासोबत प्रदीर्घ काळ काम केलं आहे. बाळासाहेब हे उत्तम व्यंगचिंत्रकार, वक्ते, नेते आणि देशातील जनतेची नाडी ओळखणारे लोकनेते होते. आजही आम्ही सर्व बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहोत असं संजय राऊत म्हणाले.

वीर सावरकर यांच्या नंतरचे एकमेव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यामुळे सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे या दोघांनाही भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी केली. अनेक राज्यस्तरीय नेत्यांना राजकीय स्वार्थासाठी भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे. मग बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा महान नेता… वीर सावरकर यांच्यासारखा महान स्वातंत्र्य सेनानी याना भारतरत्न का देण्यात आला नाही असा सवाल संजय राऊतांनी केंद्र सरकारला केला.

निष्ठा आणि अस्मिता या शब्दांना त्यांनी महत्त्व प्राप्त करून दिले त्याचे तेज कोणालाही नाही. बाळासाहेब असतानाही शिवसेनेवर घाव घालण्याचे अनेकांनी प्रयत्न केले आणि त्यांच्या नंतरही हे प्रयत्न चालूच आहेत. बाळासाहेबांनी सतत ढोंगाचा तिरस्कार केला. आज बाळासाहेब असते तर कमरेखाली वार करणाऱ्यांची अवस्था त्यांनी वाईट केली असती असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला.