औरंगाबाद | कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शहरात सध्या शनिवार आणि रविवारी विकेंड लॉकडाऊन, संचारबंदी असताना देखील रविवारी रोशनगेट भागात रस्त्यावरच बकऱ्याचा बाजार भरला. यावेळी कोरोना नियमांचे उल्लंघन करून शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती.
कोरोनामुळे आणि डेल्टा प्लस या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या निर्बंध लावण्यात आलेले आहेत. या अंतर्गत शनिवार आणि रविवार खडक लॉकडाऊन लावण्यात आलेले आहे. असे असताना देखील रोशन गेट भागातील रस्त्यावर शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी कोरोना नियमांचा पार फज्जा उडाल्याचे दिसून आले. ना सोशल डिस्टंसिंग त्याबरोबरच कुणीही तोंडाला मास्क लावलेले नव्हते. अशा अवस्थेत शेकडो नागरिक गर्दी करून बाजारात फिरताना दिसून आले. यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.
बकरी ईद हा सण जवळ आल्याने नागरिकांनी बकऱ्या खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बाजारात गर्दी केली होती. बकरी ईद सणाला बकऱ्याची बळी देण्याची प्रथा असल्यामुळे नागरिक बकऱ्या खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये येत आहेत. मात्र या ठिकाणी कोरोना नियमांची पायमल्ली होताना दिसून आले.