हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतामध्ये नद्यांना धार्मिक अन सांस्कृतिक महत्त्व आहे. प्रत्येक नदीचे काही खास वैशिष्ट्य असते, पण स्वर्णरेखा नदी ही एक अशी नदी आहे जी शुद्ध सोन्याच्या कणांनी भरलेली आहे. या नदीच्या पाण्यात सोनं वाहत असल्यामुळे ती झारखंड राज्यात एक अनोखी नदी म्हणून ओळखली जाते. हि नदी भारताच्या झारखंड आणि ओडिशा राज्यातील एक महत्वाची नदी आहे. ती मुख्यतः झारखंड राज्याच्या दक्षिण भागातून उगम पावते आणि ओडिशा राज्यातही वाहते. या नदीला विविध स्थानिक लोक “स्वर्णरेखा” (Subarnarekha River) म्हणून ओळखतात. तिची लांबी 474 किलोमीटर आहे.
स्वर्णरेखा नदीत सोन्याचे कण आढळतात –
झारखंडच्या स्वर्णरेखा नदीत सोन्याचे कण आढळतात, ज्यामुळे स्थानिक लोक या नदीतील वाळू चाळून सोने काढतात. हे सोने ते बाजारात विकून पैसे कमवतात. ही प्रक्रिया अनेक पिढ्यांपासून चालत आहे अन त्या भागातील लोकांसाठी ही एक महत्वाची उपजीविका बनली आहे. पहाटेपासूनच या नदी किनाऱ्यावर लोक वाळू चाळत असतात, त्यातून सोन्याचे कण गोळा करून ते विकतात.
नदीतील सोनं कुठून येते –
या स्वर्णरेखा नदीतील सोने कुठून येते हे अजूनही एक गूढच आहे. शास्त्रज्ञ आणि भूगर्भशास्त्रज्ञांनी यावर संशोधन केले आहे, पण त्यांना या गूढाचा उलगडा करण्यात यश आलेले नाही. काही भूगर्भशास्त्रज्ञ असा विश्वास व्यक्त करतात की स्वर्णरेखा नदी खडकांमधून वाहते आणि त्यामध्ये सोने कण म्हणून आढळते, पण यासाठी ठोस पुरावे नाहीत. यासोबतच स्वर्णरेखा नदीच्या उपनदीतही सोने आढळते. करकरी नदी, जी स्वर्णरेखा नदीची उपनदी आहे, तिच्या वाळूमध्येही सोन्याचे कण आढळतात. हा देखील अंदाज आहे की स्वर्णरेखा नदीतून येणारे सोन्याचे कण करकरी नदीतून येतात. त्यामुळे स्वर्णरेखा नदी केवळ भारतातील एक जलस्रोतच नाही, तर एक आर्थिक साधनही आहे. या नदीतून मिळालेलं सोने स्थानिक लोकांसाठी उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत बनलेलं आहे.