हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अगदी प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत लोकांचा गुंतवणुकीतील (Money Investment) कल वाढत निघाला आहे. सध्याची आर्थिक स्थिती बघता गुंतवणूक हा आपले आर्थिक भविष्य सुरक्षित करण्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. तसेच या गुंतवणुकीच्या माध्यमातून बचत वाढवता येते आणि महागाईच्या जोखमीपासून संरक्षण मिळते , त्यामुळे मोठया प्रमाणात लोक विविध ठिकाणी गुंतवणूक करताना दिसतात. पूर्वी लोक सोन्यात गुंतवणूक करत होते , पण आताच्या घडीला म्युच्युअल फंडांत गुंतवणुकीसाठी मोठी पसंती मिळत आहे. या दोन्हीमधला कोणता पर्याय गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरेल, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, तर चला जाणून घेऊयात याबद्दल सर्व माहिती.
सोन्यात गुंतवणूक –
सोन्यात गुंतवणूक (Gold Investment) ही एक दीर्घकालीन आणि सुरक्षित पर्याय मानली जाते. सोन्याच्या गुंतवणुकीचे मुख्य फायदे म्हणजे कमी जोखीम, महागाईशी जुळणारी दरवाढ आणि विक्रीस सुलभता होय . सोनं गुंतवणुकीच्या विविध स्वरूपात उपलब्ध असते , जसे की फिजिकल सोनं आणि डिजिटल सोने होय. दीर्घकालीन स्थिरता आणि कमी जोखीम या कारणामुळे सोनं विविध आर्थिक परिस्थितींमध्ये सुरक्षित ठरत असते . कठीण काळात, सोनं कर्जासाठी ठेव म्हणून वापरता येऊ शकते. पण या फायद्यासोबतच सोन्यात गुंतवणुकीचे काही तोटे देखील आहेत. उदाहरणार्थ फिजिकल सोनं सुरक्षित ठेवण्यासाठी अतिरिक्त खर्च आणि मेकिंग चार्जेस असतात. तसेच साठवणुकीसाठी बँकांचा खर्च आणि नियमित उत्पन्नाची अनुपस्थिती हे देखील तोटे आहेत.
म्युच्युअल फंडात गुंतवणूक –
म्युच्युअल फंडात (Mutual Fund) गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे तसेच तोटे आहेत. या गुंतवणुकीत, गुंतवणूकदारांचा पैसा विविध प्रकारच्या संपत्तीमध्ये जसे कि शेअर्स, रोखे, इतर मालमत्तांमध्ये विभागलेले दिसते , ज्यामुळे जोखीम कमी होण्यास मदत होते. तसेच, एसआयपी (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) सारख्या पर्यायांद्वारे कमी रकमेतही गुंतवणूक करणे शक्य होते, ज्यामुळे सामान्य लोकांसाठी ही गुंतवणूक अधिक फायदेशीर बनते. यामुळे महागाईवर मात करण्याची क्षमता मिळवली जाते आणि दीर्घकालीन चांगल्या नफा मिळतो . त्याचबरोबर, म्युच्युअल फंडामध्ये पैसे तात्काळ रिडीम करण्याचा पर्याय देखील उपलब्ध असतो. पण यासोबत म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना काही तोटेही आहेत. यामधील नफा हा शेअर बाजाराच्या चढ-उतारांवर अवलंबून असतो , त्यामुळे जोखीम असू शकते. परताव्यांसाठी दीर्घकालीन गुंतवणूक आवश्यक असते आणि व्यवस्थापन फी आणि कर आकारणीचा भार देखील आहे.
दोन्हींमध्ये कोणता पर्याय गुंतवणुकीसाठी योग्य –
अनेकांना प्रश्न पडतो कि , मग या दोन्हींमध्ये कोणता पर्याय गुंतवणुकीसाठी योग्य ठरेल. जर तुम्हाला कमी जोखीम घ्यायची असेल, तर सोनं हा एक सुरक्षित पर्याय ठरतो, कारण त्याचे मूल्य स्थिर असते आणि ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगले असते. दुसरीकडे म्युच्युअल फंड उच्च नफ्यासाठी योग्य ठरू शकतात, तसेच यामध्ये विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केली जाते. पोर्टफोलिओची विविधता साधण्यासाठी, दोन्ही पर्यायांमध्ये गुंतवणूक करणे विचारात घेतले जाऊ शकते, ज्यामुळे जोखीम कमी करता येते आणि विविध उत्पन्न स्रोत मिळवता येतात.