औरंगाबाद : महापालिकेने शहर हद्दीत समावेश झालेल्या सातारा- देवळाई भागात आता नवीन पाच शाळा सुरु करण्याचे ठरवले आहे. तेव्हा या शाळा सुरू केल्यास पूर्ण क्षमतेने विद्यार्थी मिळतील का, यासाठी महापालिकेडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणातून चांगला प्रतिसाद समोर आला की लगेच चालू आर्थिक वर्षांपासून शाळा सुरू करण्याचा पालिकेचा विचार असल्याच समोर आले आहे. राज्य सरकारने आदेश जारी करत 2016 मध्ये सातारा व देवळाई हा परिसर पालिकेत समाविष्ट केला. या पूर्वी हा भाग सिडकोत समाविष्ट होता. या परिसरात सुमारे 40 हजार लोकसंख्या असल्याचे बोलले जाते. हा भाग पालिकेत समाविष्ट झाला, त्यावेळी सातारा आणि देवळाई असे दोनच वॉर्ड तयार केले गेले. या वॉर्डांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. एप्रिल 2020 मध्ये पालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार होती, त्यासाठी निवडणूक आयोगाने वॉर्डरचना केली. या वॉर्डरचनेत सातारा-देवळाई भागात पाच वॉर्ड तयार करण्यात आले आहेत.
त्यानुसार पालिकेने पाच वॉर्ड डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक वॉर्डात एक शाळा सुरु करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी शिक्षण विभागाच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षणाबद्दल शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे यांनी सांगितले की, पालिका प्रशासकांच्या आदेशानुसार सर्वेक्षणाचे काम सुरु केले आहे. किमान पाच शाळा या भागात सुरु करण्याचे नियोजन आहे.
सात दिवसांपासून सर्वेक्षण सुरु असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. जास्त विद्यार्थी मिळतील त्या भागातील शाळा प्राधान्याने सुरु केली जाणार आहे. सर्वेक्षणासाठी सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार यांच्या निर्देशानुसार बाळासाहेब जाधव, आसाराम जाधव, वैशाली चव्हाण, मोनिका चव्हाण हे शिक्षक काम करीत आहेत. अजून काही दिवस सर्वेक्षण चालणार आहे.