हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| अमेरिकेत कॉम्प्युटर सायन्सचे (Computer Science) शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जगातील सर्वात मोठी टेक कंपनी गुगलने समर २०२५ साठी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग इंटर्नशिप भरती (Software Engineering Internship Recruitment) जाहीर केली आहे. ही संधी पीएचडी अभ्यासक्रमात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे वेळ न वाया घालवता 28 मार्चपर्यंत इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करावेत.
गुगलच्या अधिकृत संकेतस्थळानुसार, या इंटर्नशिपसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 मार्च 2025 आहे. मात्र, अर्जांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त झाल्यास गुगल ही भरती मुदतीपूर्वीच बंद करू शकते. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी शक्य तितक्या लवकर अर्ज करणे गरजेचे आहे.
कोण अर्ज करू शकतो?
या इंटर्नशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किंवा तत्सम टेक्निकल क्षेत्रात पीएचडी करत असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवारांना C, C++, Java किंवा Python यांसारख्या भाषांमध्ये प्रोग्रॅमिंगचा अनुभव असावा. डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदम्सची माहिती असलेल्या विद्यार्थ्यांना यामध्ये प्राधान्य दिले जाणार आहे.
इंटर्नशिपचा कालावधी आणि फायदे
ही इंटर्नशिप १२ ते १४ आठवड्यांची असेल. दरम्यान, निवड झालेल्या उमेदवारांना गुगलच्या विविध महत्त्वाच्या प्रोजेक्ट्सवर काम करण्याची संधी मिळेल. सध्या गुगलने इंटर्नशिपसाठी मिळणाऱ्या स्टायपेंडची माहिती दिलेली नाही. मात्र, या पदासाठी फुल-टाईम नोकरदारांना वार्षिक ९४ लाख ते १.२६ कोटी रुपयांपर्यंत पगार मिळतो. त्यामुळे इंटर्नशिपचा अनुभव भविष्यात मोठ्या संधी मिळवून देऊ शकतो.
अर्ज कसा करायचा?
इच्छुक उमेदवारांनी गुगलच्या करिअर पेजवर जाऊन “Software Engineering Intern PhD Summer 2025” टॅबवर क्लिक करावे. तिथे Apply वर क्लिक करून अर्ज भरावा. अर्जासोबत अपडेटेड CV आणि शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट (अनऑफिशियल किंवा ऑफिशियल) अपलोड करावी.
दरम्यान, ही इंटर्नशिप पूर्णपणे अमेरिकेतील विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यामुळे अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अमेरिकेत राहत असणे आवश्यक आहे. गुगलमध्ये काम करण्याचे स्वप्न असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. त्यामुळे सर्व माहिती वाचून उमेदवारांनी लवकरात लवकर आपल्या अर्ज जमा करावेत.