व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

भारत- कॅनडा तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा मोठा निर्णय; सर्व न्यूज चॅनेलला दिल्या ‘या’ सूचना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर भारत आणि कॅनडामधील संबंध ताणले गेले आहेत. भारतीय सुरक्षा यंत्रणेने कॅनडातील एका दहशतवाद्याची हत्या केल्याचा गंभीर आरोप जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर लावला आहे. या प्रकरणामुळे भारत आणि कॅनडातील राजनैतिक संबंध अत्यंत बिघडले आहेत. मुख्य म्हणजे, या वादात भारत सरकारने न्यूज चॅनेलसाठी काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. ज्यामध्ये, “गुन्हेगारी किंवा दहशतवादाशी संबंधित असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला न्यूज चैनल मध्ये बोलवण्यात येऊ नये” असे आदेश देण्यात आले आहेत.

माहिती आणि प्रचारण मंत्रालयाने न्यूज चॅनेलसाठीच्या गाईडलाईन्सचे पत्रक जाहीर केले आहे. या पत्रकामध्ये केंद्र सरकारकडून न्यूज चॅनेलला काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. “भारतातील कोणत्याही न्यूज चॅनलने दहशतवाद किंवा गुन्हेगारीशी संबंधित असणाऱ्यांना व्यासपीठ उपलब्ध करुन देऊ नये, तसेच कायद्यानुसार बंदी घालण्यात आलेल्या संस्थेशी संबंधित लोकांनाही डिबेटसाठी बोलवण्यात येऊ नये” अशा गाईडलाईन्स न्यूज चॅनेलला घालण्यात आल्या आहेत. मुख्य म्हणजे, या निर्देशांचे उल्लंघन केल्यास न्यूज चॅनलवर देखील कारवाई करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने, संविधानाच्या कलम १९(२) मध्ये उल्लेख करण्यात आलेल्या वाजवी निर्बंधानुसार हे निर्देश जारी केले आहेत. त्यामुळे या निर्देशांचे पालन करणे न्यूज चॅनेलला बंधनकारक असेल. दरम्यान, नुकत्याच एका न्यूज चॅनलने दहशतवादाचे गुन्हे दाखल असलेल्या आणि भारत सरकारने बंदी घातलेल्या संस्थेची संबंधित एका परदेशी व्यक्तीला डिबेटसाठी बोलवले होते. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर मंत्रालयाने न्यूज चॅनलसाठी गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. पुढे जाऊन पुन्हा अशी चूक घडू नये यासाठी ही खबरदारी बाळगण्यात आली आहे.