हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याण मंडळ यांच्या पहिल्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत वय 65 आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या ऑटो रिक्षा व टॅक्सी चालकांना 10,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे असंख्य रिक्षा व टॅक्सी चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यातील 14 ,387 चालकांना लाभ –
या महत्वाच्या निर्णयामुळे राज्यातील 14 ,387 चालकांना लाभ होणार आहे. वयाच्या 65 वषांतील किंवा अधिक वयाच्या चालकांना हा अनुदान लाभ मिळणार आहे, पण हे लाभ त्याच चालकांना मिळतील, ज्यांनी कल्याण मंडळात किमान पाच वर्षांसाठी सदस्यत्व घेतलेले आहे. प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत 65 वर्ष किंवा त्याहून अधिक वय असलेल्या चालकांना 10,000 रुपये अनुदान दिले जाईल. याशिवाय, कल्याण मंडळाने आरोग्य विमा, मृत्यू आणि अपंगत्व विमा, तसेच चालकांच्या मुलांसाठी स्कॉलरशिप कार्यक्रमही सुरू करण्याची घोषणा केली आहे.
राज्य सरकारकडून 50 कोटी रुपयांचा निधी –
अनेक चालक असंघटित आहेत आणि त्यांना सामाजिक सुरक्षा लाभ नाहीत. या परिस्थितीतून चालकांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने कल्याण मंडळाला 50 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्याचसोबत अतिशय चांगले काम करणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना, चालक संघटनांना, तसेच रिक्षा स्टँडना वार्षिक पुरस्काराने सन्मानित करण्याची योजना मांडली आहे.




