औरंगाबाद | मागील एका वर्षाहून अधीक काळापासून जगभरात धुमाकूळ घालत असलेला कोरोना सरकार आणि प्रशासनाच्या आकडेवारीनुसार पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाला आहे. याला आळा घालण्यासाठी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा लॉकडाऊन चे हत्यार उपसले आहे. सध्या राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. यामुळे राज्यातील बहुतांश व्यवहार ठप्प झाले आहेत. तसेच लॉकडाऊनमुळे राज्यातील एस टी वाहतूक देखील बंद करण्यात आली आहे. तोच दुसरीकडे रेल्वे वाहतूक आणि खासगी वाहतूक अनेक निर्बंध घालून सुरु आहे. यामुळे एस टी महामंडळाच्या औरंगाबाद विभागाला दररोज सुमारे ५० ते ५५ लाख रुपयांचे भुर्दंड सहन करावे लागत आहे. यामुळे सध्या राज्यातील एस टी वाहतूक कोमात असल्याचे चित्र दिसत आहे.
महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्हयात औरंगाबाद शहरासह एस टी महामंडळाचे एकूण ८ आगार आहेत. त्यामध्ये शहरातील औरंगाबाद १ आणि औरंगाबाद २ तसेच ग्रामीण भागातील सिल्लोड, कन्नड, गंगापूर, सोयगाव, पैठण, वैजापूर आदी डेपोचा समावेश आहे. सध्या लॉकडाऊन असल्याने या सर्व डेपोमधील १०० टक्के एस टी बसेस जागेवर उभ्या आहेत. यामुळे औरंगाबाद विभागाला दररोज सुमारे ५० ते ५५ लाख रुपयांचा भुर्दंड बसत असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामुळे या काळात एस टी महामंडळाला मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. तसेच याचे दूरगामी परिणाम होतील असे भाकीत देखील वर्तवले आहे. सध्या लोकंडाऊनमध्ये एस टी साठी सकारात्मक गोष्ट म्हणजे औरंगाबाद विभागातून दररोज सुमारे ८ ते १० मालवाहतूक करणाऱ्या बसेस धावत आहेत. यातून विभागाला सुमारे एका लाखाचे उत्पन्न मिळते. त्यामुळे थोडेफार का होईना एसटीला उत्पन्न मिळत आहे. यामुळे सध्या लॉकडाऊनमध्ये एसटी महामंडळाची भिस्त केवळ मालवाहतुकीवर अवलंबून आहे. औरंगाबाद विभागातील एकूण ८ डेपो मिळून एकूण ३० मालवाहतूक करणाऱ्या बसेस आहेत. या मालवाहतूक करणाऱ्या एका बसची क्षमता सुमारे १० टन असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
बस धावण्यासाठी किमान २० प्रवासी आवश्यक –
राज्यातील सत्ताधारी सरकारने कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात वर्षभरानंतर पुन्हा एकदा लॉकडाऊन जनतेवर लादले आहे. जनता लॉकडाऊनला जुमानत नसेल तो भाग वेगळा असला तरी साहसनाने मात्र लॉकडाऊनची कडक अंबलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहे. या लॉकडाऊनमध्ये सार्वजनिक एसटी बसेसना केवळ अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसाठी आपल्या क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने चालविण्यास परवानगी दिली आहे. यामुळे जर एखादी बस मार्गस्थ करायची असेल तर किमान २० प्रवासी असणे आवश्यक आहे. जर २० प्रवासी मिळाले तरच बस मार्गस्थ केली जाते. परंतु सध्या एकही प्रवासी मिळत नसल्याने सध्या बसेसची प्रवासी वाहतूक १०० टक्के बंद आहे. असे संबंधित अधिकाऱ्यांनी हॅलो महाराष्ट्राच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
शहरातील डेपोमध्ये शेकडो बसेस उभ्या –
औरंगाबाद शहरात असलेल्या औरंगाबाद १ म्हणजे सिडको बसस्थानक आणि औरंगाबाद २ म्हणजे मध्यवर्ती बस स्थानक या दोन्ही डेपो मिळून सुमारे २०० ते २२५ बसेस आहेत. यामध्ये शिवनेरी, शिवशाही, विठाई, निम अराम, नवीन आलेल्या सीटर-स्लीपर आदी बसेसचा समावेश आहे. लॉकडाऊनमुळे या सर्व बसेसची चाके मात्र डेपोमध्येच रुतली आहेत.
सध्या एसटीची भिस्त केवळ मालवाहतुकीवर –
मागील वर्षी लॉकडाऊनमध्ये एसटीने आपले झालेले नुकसान काहीसे भरून काढण्यासाठी २६ मेपासून औरंगाबाद विभागात एसटीने कार्गोसेवा (मालहतूक) सुरु केली. यामाध्यमातून एसटीला आजपर्यंत तब्बल १ कोटी ८१ लाख ८४ हजार ५६ रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहेत. तसेच आजपर्यंत औरंगाबाद विभागातून मालवाहतुकीच्या एकूण अडीच हजार फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. एसटीचे मालवाहतुकीचे दर १०० किमीपर्यंत प्रति किमी ४६ रुपये, १०१ किमी ते २५० किमीपर्यंत प्रति कीमी ४४ रुपये तर २५१ किमीच्या पुढे प्रति किमी ४२ रुपये असल्याचे एसटीने कळविले आहे.