राज्य सरकारची महत्तवाकांक्षी योजना म्हणून ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेची देशभर चर्चा झाली मात्र आता या योज़नेबाबत एक महत्वाची अपडेट हाती आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. आता या योजनेतून काही महिलांना 1500 रुपयांऐवजी फक्त 500 रुपये मिळणार आहेत. यामागील कारण म्हणजे संबंधित महिलांना आधीच ‘महिला शेतकरी सन्मान योजनेचा’ लाभ मिळत आहे. त्यामुळे डबल फायदा टाळण्यासाठी सरकारने ही काटछाट केली आहे.
योजनेतील बदलाचे तपशील
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘लाडकी बहीण’ योजना जाहीर केली होती, जी महिलांसाठी ‘गेमचेंजर’ ठरली होती. लाखो महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. मात्र आता नवीन अटी आणि निकष लागू करण्यात आले असून त्यानुसार ‘महिला शेतकरी सन्मान योजने’चा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून फक्त 500 रुपये मिळणार आहेत. या निर्णयाचा थेट परिणाम सुमारे 8 लाख महिलांवर होणार असून यापुढे त्यांना 1500 रुपये मिळणार नाहीत.
विरोधकांची टीका
या निर्णयावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका करत विचारले की, “तेव्हा सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का?” तर राऊत यांनी टोला लगावत म्हटलं, “महिलांच्या मतांची किंमत लवकरच शून्यावर येईल.”
सरकारचा युक्तिवाद
सरकारच्या मते, एकाच व्यक्तीला दोन सरकारी योजनांचा आर्थिक लाभ मिळू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. तिजोरीवरील ताण आणि आर्थिक शिस्त राखण्यासाठी हा बदल गरजेचा असल्याचं सरकारचं म्हणणं आहे.
निवडणुकीपूर्वी जाहीर झालेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेतील या बदलामुळे महिलांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. राजकीय पक्षांनी देखील सरकारवर निशाणा साधला आहे. आता पाहावं लागेल की सरकार या निर्णयावर ठाम राहतं की जनतेच्या दबावाखाली पुन्हा काही बदल करते.




