ग्रामपंचायत निवडणूकीसाठी आज मतमोजणी; उमेदवारांचे भवितव्य ठरणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात अनेक ग्रामपंचायत निवडणुकांचा आज निकाल लागणार आहे. निवडणुकीमुळे अगदी स्थानिक गाव पातळीवर राज्यातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे गट, भाजप असा सामना रंगला आहे. राज्यातील सातारा जिल्ह्यातही निवडणूक होत असल्याने जिल्ह्यातील भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गटाच्या नेत्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सातारा जिल्ह्यातील 259 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुरळा उडाला असून रविवारी सर्वत्र चुरशीने मतदान झाले. आता प्रत्यक्ष मतमोजणी होणार असून निवडणुकीत कोण बाजी मारेल हे स्पष्ट होणार आहे.

सातारा जिल्ह्यात 259 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी चुरशीने मतदान झाले. यासाठी निवडणूक विभागाने शिस्तबद्ध नियोजन केल्याने शांततेत मतदान पार पडले. आज मतमोजणीस सुरुवात होत असून कराड तालुक्यातीळ ग्रामपंचातीच्या मतमोजणीसाठी 20 टेबल ची व्यवस्था करण्यात आली आहे. 26 निवडणूक निर्णय अधिकारी, 33 सहाय्यक निवडणूक अधिकारी व 40 इतर कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

कराड तालुक्याची मतमोजणी 2 टप्प्यात होणार

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतमोजणी केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात हनुमानवाडी, वनवासमाची, ओंडोशी, चोरजवाडी, तारुख, दुशेरे, हिंगगोळे ,घोलपवाडी, अंतवडी, वडगाव हवेली, आणे, पाडळी हेळगाव, मनू, कासारशिरंबे, पश्चिम सुपने, किवळ, येळगाव, आटके,चरेगाव, तळबीड या 20 गावांची मतमोजणी होणार आहे. तर दुसर्या टप्प्यात जुने कवठे, विजयनगर ,डेळेवाडी, धावरवाडी, वानरवाडी ,जुळेवाडी, गणेशवाडी, शामगाव ,कुसुर, कालगाव, रेठरे खुर्द, कोरेगाव, सुपने या 13 गावांची मतमोजणी होणार आहे.

मतमोजणीमुळे कराड शहरातील वाहतुक व्यवस्थेत बदल….

कराड तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीची मतमोजणीस येथील प्रशासकीय मध्यवर्ती कार्यालयात सकाळी सुरुवात झाली असून या पार्श्वभूमीवर शहरात येणारी व बाहेर जाणाऱ्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. नवीन प्रशासकीय इमारतीकडे जाणारा मार्ग– भेदा चौक ते शाहू चौक कडे जाणारा रोड, दत्त चौक ते शाहू चौक जाणारा रोड, दत्त चौक ते भेदा चौक जाणारा रोड- पोपटभाई पेट्रोल पंप ते दत्त चौक जाणारी वाहतूक बंद असणार आहे.

भेदा चौका कडून दत्त चौकाकडे जाणारी वाहने ही भेदा चौक- विजय दिवस चौक या मार्गाने कराड शहरात जातील.कोल्हापूर बाजूकडून येणारी वाहतूक व दत्त चौकाकडे जाणारी वाहने ही कोल्हापूर नाका- पोपटभाई पेट्रोल पंप- भेदा चौक विजय दिवस चौक मार्गे जातील. दत्त चौक ते शाहू चौक, भेदा चौक बाजूकडे जाणारी वाहने ही दत्त चौक-कर्मवीर पुतळा-विजय दिवस चौक भेदा चौक मार्गे जातील. वारूंजी कडून जुन्या कोयना पुलावरून कराड शहरात येणारी वाहने ही दैत्यनिवारणी चौक- अंजठा चौक पोपटभाई पेट्रोल पंप- भेदा चौक- विजय दिवस चौक मार्गे जातील मात्र शाहू चौकात येण्यास मनाई करण्यात आली आहे.