हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bailgada Sharyat) बैलगाडा शर्यत हा मातीतला खेळ आहे आणि महाराष्ट्राला या खेळाची अनेक वर्षांची परंपरा आहे. पारंपरिक वारसा आणि शेतकऱ्यांचा छंद म्हणून बैलगाडा शर्यतीची ओळख आहे. मध्यंतरी या खेळात झालेले हृदयद्रावक अपघात आणि प्राण्यांना झालेली इजा या खेळावर बंदी येण्याचे मुख्य कारण ठरले. मात्र पुन्हा एकदा बैलगाडा शर्यतीला न्यायालयाने मंजुरी दिली आणि तेव्हापासून राज्यभरात नुसता जल्लोष पहायला मिळतो आहे.
आता राज्यातील विविध भागांमध्ये पुन्हा एकदा बैलगाडा शर्यत सुरु झाली. अशातच बैलगाडा शर्यत प्रेमींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यातील बैलगाडा मालकांसाठी अत्यंत भव्य अशी बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली आहे. ही शर्यत जिंकणाऱ्या बैलगाडा मालकाला बक्षीस म्हणून चक्क १ बीएचके फ्लॅट दिला जाणार आहे. चला तर जाणून घेऊया ही बैलगाडा शर्यत कुठे आणि कोणी आयोजित केली आहे?
‘इथे’ पार पडणार ही भव्य बैलगाडा शर्यत (Bailgada Sharyat)
या आगळ्या वेगळ्या बैलगाडा शर्यतीची माहिती एव्हाना महाराष्ट्रभर झाली आहे. त्यामुळे ही शर्यत नेमकी कुठे होणार आहे? याबाबत प्रयेकजण उत्सुक आहे. तर माहितीनुसार, महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथे या बैलगाडा भव्य शर्यतीचे जंगी आयोजन करण्यात आले आहे. सध्या संपूर्ण सांगली जिल्ह्यात या आगळ्या वेगळ्या बैलगाडा शर्यतीला घेऊन एक वेगळीच उत्सुकता पहायला मिळते आहे.
शर्यतीच्या आयोजनाचे कारण
या भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यामागील खास कारण असे की, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा वाढदिवस आहे. (Bailgada Sharyat) यानिमित्त लाहीगडे फाउंडेशन कडून ही बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली आहे. या बैलगाडा शर्यतीला ‘जयंत केसरी बैलगाडा शर्यत’ असे नाव देण्यात आले आहे. माहितीनुसार, या शर्यतीसाठी तब्बल १० एकर जागेवर मैदान तयार केले जाणार आहे.
‘या’ दिवशी होणार ही बैलगाडा शर्यत
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १७ फेब्रुवारी २०२४ रोजी ही भव्य बैलगाडा शर्यत पार पडणार आहे. या शर्यतीसाठी १० एकर मैदान तयार केले जात आहे. इथे साधारण १ लाख प्रेक्षक उपस्थित राहू शकतील. सध्या या बैलगाडा शर्यतीची हवा राज्यभरात पसरली आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यतीचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी आशा आहे.
विजेत्याला मिळणार नवाकोरा १ बीएचके फ्लॅट
(Bailgada Sharyat) ‘जयंत केसरी बैलगाडा शर्यत’ विजेत्या बैलगाडा मालकाला बक्षीस म्हणून १ बीएचके फ्लॅट दिला जाणार आहे. हा फ्लॅट २० लाख रुपयांचा असून पहिल्या क्रमांकाचे बक्षीस म्हणून घोषित करण्यात आला आहे. तर, शर्यतीत दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या बैलगाडा मालकाला ७ लाख रुपये आणि तिसरा क्रमांक पटकावणाऱ्या बैलगाडा मालकाला ५ लाख रुपयांची रक्कम बक्षीस म्हणून दिली जाणार आहे.
विविध राज्यातील बैलगाडा मालक घेणार सहभाग
या भव्य बैलगाडा शर्यतीची आतापर्यंत सर्वदूर माहिती पसरली आहे. त्यामुळे या शर्यतीत महाराष्ट्रासह कर्नाटक आणि मध्य प्रदेश राज्यातील बैलगाडा मालकसुद्धा सहभाग नोंदवणार असल्याचे माहिती समोर येत आहे. या स्पर्धेत २०० बैलगाडा मालक भाग घेऊ शकणार आहेत. त्यामुळे ही बैलगाडा शर्यत खऱ्या अर्थाने भव्य ठरणार आहे. (Bailgada Sharyat)