घरात राहू, कोरोनाशी लढू | जागतिक किर्तीची पर्यावरण कार्यकर्ता आणि मागच्या वर्षीची ‘टाईम्स पर्सन ऑफ द इयर” ठरलेली ग्रेटा थनबर्ग हीने तिला नोव्हेल कोरोना व्हायरसची बाधा होऊन त्यामधून ती बरी झाल्याचं म्हटलं आहे. ती १७ वर्षांची असून स्वीडन या देशामधे रहाते.
मागच्या पंधरा दिवसांपूर्वी ती कोरोनाचा संसर्ग असलेल्या काही देशांच्या दौऱ्यावरून परत आल्यानंतर तिच्या घरच्यांपासून विलग रहात होती. “दहा दिवसांपूर्वी मला कोरोनाची काही लक्षणे जाणवू लागली. थकवा, घाम येणे, घसा खवखवणे आणि खोकला अशी ती लक्षणे होती”, असं ती सांगते. तिच्या सोबत प्रवास केलेल्या तिच्या वडिलांनाही तशीच लक्षणे पण जास्त तीव्रतेने जाणवत होती.
https://www.instagram.com/p/B-HwpQkJqrc/?igshid=jm9so08nmjaa
स्वीडनमधे तातडीच्या उपचारांची गरज असेल तरच नोव्हेल कोरोना व्हायरसची चाचणी केली जाते. तीची लक्षणे सौम्य असल्याने तिला घरीच आयसोलेशनमधे रहायला सांगण्यात आले होते. “माझी चाचणी झाली नसली तरी माझा प्रवास आणि सध्याची परिस्थिती पहाता मला हा रोग झाला असण्याची खूप जास्त शक्यता आहे” असं तिने म्हटलं आहे. ती आता बरी झाल्याचंही तिने तिच्या इन्स्टाग्राम पोस्ट मधे सांगितलं आहे.
“मला सुरूवातीला काहीच लक्षणे जाणवली नाहीत. बऱ्याच तरूण लोकांना या आजारात जास्त तीव्र लक्षणे जाणवणार नाहीत. परंतु यामुळेच हा रोग जास्त धोकादायक आहे. कारण असे लोक या लक्षणांकडे दुर्लक्ष करून ज्या लोकांना या रोगाचा जास्त धोका आहे त्यांच्यापर्यंत हा रोग पोहचवू शकतात. या लोकांसाठी हा जीवण – मरणाचा प्रश्न असू शकतो”, असं तिने म्हटले आहे. आपल्या स्थानिक सरकारने दिलेल्या सुचना पाळा आणि या रोगाचा प्रसार कमी करण्यासाठी घरीच थांबा असं आवाहन तिने केले आहे.
कोरोना व्हायरसमुळे मृत्यू होण्याचा धोका ६० पेक्षा जास्त वयस्कर असलेल्या लोकांमधे जास्त आढळतो. तर ४० पेक्षा कमी वय असलेल्या लोकांमधे तो बराच कमी आहे. ह्रदयविकार, उच्च रक्तदाब, श्वसनासंबंधीचे आजार असलेल्या लोकांमधेही कोरोनामुळे मृत्यू होण्याची शक्यता जास्त आहे. असं असलं तरीही कोणतीच व्यक्ती या रोगापासून पुर्णपणे सुरक्षित नाही. त्यामुळे लक्षणं आढळल्यास स्वतःच्या कुटूंबासून वेगळं राहणे आणि प्रत्येकाने घराबाहेर न पडणे हाच या रोगापासून सुरक्षित रहाण्याचा एकमेव उपाय आहे असं तज्ञ सांगतात.