हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नागरिकांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. आता पुण्यात थैमान घालणाऱ्या गुइलेन-बॅरे सिंड्रोमने (GBS) नागपूरमध्ये ही शिरकाव केला आहे. या आजाराचे नागपूरमध्ये सहा रुग्ण आढळून आले आहेत. सध्या नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ही प्रकरणे समोर आल्यानंतर आरोग्य विभागाने आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या GBS आजाराचे नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये चार रुग्ण उपचार घेत आहे. त्यापैकी १९ वर्षीय एका रुग्णाची प्रकृती स्थिर आहे आणि त्याला जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र, एका ८ वर्षीय मुलाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे. यासह इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमधील ३७ वर्षीय रुग्णाची स्थिती गंभीर असून तो सध्या व्हेंटिलेटरवर आहे. तर, मेयो रुग्णालयात दाखल असलेल्या दोन रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
गुइलेन-बॅरे सिंड्रोम म्हणजे काय?
गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मीळ परंतु गंभीर स्वरूपाचा आजार आहे. या आजाराची सुरुवात हात आणि पायांमध्ये मुंग्या येणे, कमकुवतपणा आणि वेदना यापासून होते. पुढे या लक्षणांमुळे अर्धांगवायू किंवा श्वसनविकार होऊ शकतो.
GBS ची प्रमूख लक्षणे
हात, पाय किंवा घोट्यात मुंग्या येणे.
चालताना त्रास होणे किंवा अशक्तपणा जाणवणे.
दृष्टीदोष किंवा डोळे हलवण्यास अडचण होणे.
श्वास घेण्यास अडथळा येणे.
स्नायूंमध्ये तीव्र वेदना होणे.
खबरदारी आणि उपाययोजना
या आजाराचे गांभीर्य लक्षात घेत आरोग्य विभागाने नागरिकांना स्वच्छतेचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, अन्न ताजे खावे, शुद्ध पाणी पिण्यासाठी वापरावे, बाहेरचे अन्न टाळावे आणि स्वच्छतेची काळजी घ्यावी, अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, पुण्यातील रुग्णसंख्या लक्षात घेता आरोग्य विभागाकडून सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. तसेच, रुग्णांवर योग्य उपचार केले जात आहेत. यासह नागरिकांनी वेळीच लक्षणे ओळखून वैद्यकीय मदत घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.