“…असे किती बोम्मई पाहिलेत, अमित शहा-मोदीच त्यांना सरळ करतील.”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रश्नी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अजूनही आपली आडमुठेपणाची भूमिका कायम ठेवली आहे. त्यांनी ट्विट करत थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाच आव्हान दिले. याबाबत शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अमित शाह हे देशातील एका मोठ्या राजकीय पक्षाचे दोन वेळा अध्यक्ष राहिले आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर अवश्य तोडगा काढतील. असे किती बोम्मई त्यांनी पाहिले असतील. मोदी आणि शहा बोम्मईंना सरळ करतील, असे पाटील यांनी म्हंटले आहे.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतरही काही फरक पडणार नाही, अशी बोम्मई यांची भाषा म्हणजे उन्मादाची बाब आहे. अमित शहा हे सर्वात मोठ्या पक्षाचे ते दोन वेळेस अध्यक्ष राहिलेले आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक बोम्मई पाहिले आहेत, ते त्यांना सरळ केल्याशिवाय राहणार नाहीत, अशी आपल्याला खात्री आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे यावरून त्यांची भूमिका स्पष्ट होते. आम्ही राज्यात एकत्र आहोत, आम्ही महाराष्ट्रीयन आहोत आणि आमची अस्मिता एकच असल्याचे पाटील यांनी म्हंटले.

बसवराज बोम्मई यांचे ट्विट काय?

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज सकाळीच सीमाप्रश्नावरून एक ट्विट केले आहे. महाराष्ट्राच्या नेत्यांनी अमित शहांची भेट घेऊन काही फरक पडणार नाही, असं ट्वीट बसवराज बोम्मई यांनी केलं होतं. तर लवकरच कर्नाटकचे शिष्टमंडळही अमित शहांची भेट घेणार असल्याचं बोम्मई म्हणाले.