औरंगाबाद : पैठण तालुक्यातील बालानगर येथे अन्न व भेसळ तसेच एमआयडीसी पोलिसांनी अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्या इसमावर साडे बाराच्या सुमारास छापा टाकून १९ लाखांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैधरित्या गुटखा विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन व पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यातील वरिष्ठांना मिळाली होती. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी सु. त्री. जाधवर, पी. एस. अजिंठेकर, फिरीद सिद्धीकी तासवच पोलीस कर्मचारी राजू जावळे यांनी आरोपी गणेश ढोले याला मिनी ट्रकसह (महा.२०.इ.एल.६९४५) ताब्यात घेण्यात आले.
वाहनांची तपासणी करता वाहनामध्ये विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी पानमसाला आदी साहित्य व मिनी ट्रॅक असा एकूण १९ लाखांचा १९ हजार ६२३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी गणेश ढोले यास अटक करण्यात आली आहे, व पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील करीत आहे.