सातारा | सातारा- पुसेगाव रस्त्यावर गुटखा घेवून जाणाऱ्या गाडीचा पाठलाग करून स्थानिक गुन्हे शाखेने पकडले. त्याच्याकडून 19 लाख 50 हजार रूपयांचा गुटखा व वाहन असा 24 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रशांत देवराव आयकर (जवळा, ता. जामखेड, जि. अहमदनगर) याला अटक करण्यात आली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, कर्नाटक राज्यातून आणलेल्या गुटख्याची वाहतूक सातारा जिल्ह्यातून होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना मिळाली होती. त्यानुसार धुमाळ यांनी पोलिोस उपनिरीक्षक मदन फाळके यांना कारवाईच्या सुचना दिल्या होत्या.
फाळके यांनी मिळालेल्या माहितीच्या अधारे पुसेगाव शहरात दि.21 रोजी रात्री सापळा लावला होता. मात्र, पोलीस असल्याचा संशय आल्याने आयकर याने त्याच्या ताब्यातील वाहन सातार्याच्या दिशेने पळवले. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून खावली (ता.सातारा) येथे त्याला पकडला. त्याच्याकडे वाहनात असलेल्या मालाबाबत विचारणा केल्यावर किराणा दुकानाचे साहित्य असल्याचे त्याने संगितले.
मात्र, पोलिसांनी गाडीची पाहणी केल्यावर त्यात महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला गुटखा दिसून आला. त्यानतर पोलिसांनी त्याला स्थानिक गुन्हे शाखेत आणून त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षल अजयकुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बो-हाडे, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या सुचनेनुसार सपोनि रमेश गर्जे, पोउनि मदन फाळके, पोउनि अमित पाटील, पोलीस अंमलदार दिपक मोरे, श्रीमती मोनाली निकम, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, गणेश कापरे यांनी केली.