Gyanvapi Case : ज्ञानव्यापीबाबत कोर्टाचा मोठा निर्णय!! मशिदीच्या तळघरात पूजा करण्याची मिळाली परवानगी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gyanvapi Case : ज्ञानवापी मशिदीसंदर्भात मोठी माहिती समोर येत आहे. ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात हिंदू पक्षकारांना पूजा करण्याची परवानगी वाराणसी जिल्हा कोर्टाने दिली आहे. त्यामुळे हिंदू पक्षकारांना दिलासा मिळाला आहे. पुरात्व विभागाच्या सर्वेक्षणात मशिदीच्या परिसरात मंदिर असल्याचे पुरावे सापडले होते. आता ज्ञानवापी परिसरातील ‘व्यास का तैखाना’ येथे हिंदूंना आरती-पूजा करता येणार आहे.

1993 नंतर बंद करण्यात आली होती पूजा – Gyanvapi Case

ज्ञानवापी येथील व्यासजींच्या तळघरातील पूजेशी संबंधित अर्जावर जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयात मंगळवारी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाला. याप्रकरणी (Gyanvapi Case) न्यायालयाने आज हा आदेश दिला. तसेच येत्या सात दिवसात यासंदर्भात आवश्यक व्यवस्था करुन देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. हिंदू पक्षाने व्यासजींच्या तळघरात पूजा करण्याची परवानगी मागितली होती. सोमनाथ व्यास यांचे कुटुंब 1993 पर्यंत तळघरात पूजा करत होते. 1993 नंतर तत्कालीन राज्य सरकारच्या आदेशावरून तळघरातील पूजा बंद करण्यात आली. मात्र आज व्यासजींच्या तळघरात पूजा करण्याचा अधिकार देण्यात आला. काशी विश्वनाथ ट्रस्ट अंतर्गत तळघरात पूजा केली जाणार आहे.

मंगळवारी पार पडलेल्या सुनावणीत अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीच्या वतीने वकील मुमताज अहमद आणि इखलाक अहमद यांनी व्यासजींचे तळघर मशिदीचा एक भाग असल्याचे सांगितले होते. तळघर ही वक्फ बोर्डाची मालमत्ता आहे.त्यामुळे तेथे पूजा करण्यास परवानगी दिली जाऊ शकत नाही. हे प्रकरण प्रार्थनास्थळ कायद्याच्या आड येते असं म्हंटल होते. मात्र कोर्टाने हिंदू पक्षकारांच्या बाजूनेनिकाल दिला आहे. न्यायालयाच्या आदेशाने आता लोकांना 1993 पूर्वीप्रमाणेच तळघरात पूजा करण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे.