सातारा जिल्ह्यात 7 लाख 47 हजार 75 घरावर “हर घर तिरंगा” ध्वज फडकणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त घरो घरी तिरंगा (घर हर तिरंगा) फडकवून साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयावर तसेच प्रत्येक घरावर दि. 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकाविण्याबरोबर शासनाच्या होणाऱ्या विविध कार्यक्रमामध्ये उस्फुर्तपणे सहभागी व्हावे. सातारा जिल्ह्यातील 7 लाख 47 हजार 75 घरांना तिरंगा पुरविण्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विषयी माहिती देण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गौडा बोलत होते. या पत्रकार परिषदेला उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अर्चना वाघमळे उपस्थित होत्या.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त जिल्ह्यातील 15 अमृत सरोवरांवर स्वातंत्र्य सैनिक, सैन्य दलातील आजी-माजी सैनिक यांच्या हस्ते 15 ऑगस्ट 2022 रोजी ध्वजारोहण करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील 75 बचत गटांना 75 लाखांपर्यंतचे कर्ज वाटपाबरोबरच घरकुल आवास योजना मंजूरीचे पत्र व अनुदान वाटप करण्यात येणार आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत हुतात्मा स्मारक सुशोभीकरण, जिल्ह्याच्या ठिकाणी तिरंगा बलून सोडणे, प्रभात फेरी, जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी 75 फूट उंचीचा राष्ट्रध्वज उभारण्यात येणार आहे. सायक्लोथॉन मॅरेथॉन, वारसास्थळ पदयात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम, कार्यालयांची स्वच्छता यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात रहावी या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी दि. 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक नागरिकाने सहभाग घ्यावा, असेही आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गौडा यांनी केले आहे.