Thursday, March 23, 2023

Mumbai Indians च्या कर्णधारपदी ‘या’ अष्टपैलू खेळाडूची निवड

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात यंदा प्रथमच महिला आयपीएलचे आयोजन केलं असून 4 मार्चला पहिला सामना होणार आहे. तत्पूर्वीच दिग्गज संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने आपल्या संघाच्या कर्णधारपदी स्टार अष्टपैलू खेळाडू हरमनप्रीत कौर हिची निवड केली आहे. मुंबई फ्रँचायझीने 1.8 कोटी रुपये खर्च करून हरमनप्रीतला आपल्या संघात सामील केले होते. आता तिच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी टाकून मुंबई इंडियन्सने तिच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे.

सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मुंबई इंडियन्सने हरमनप्रीत कौरची कर्णधारपदी नियुक्ती जाहीर केली आहे. हरमनप्रीत कौर ही भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाची सुद्धा कर्णधार आहे. अलीकडेच दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषक स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने उपांत्य फेरी गाठली होती. त्यामुळे तिच्या अनुभवाचा मुंबईच्या संघाला नक्कीच फायदा होईल यात काही शंका नाही.

- Advertisement -

हरमनप्रीतला क्रिकेटचा दांडगा अनुभव

हरमनप्रीत कौरला क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. तीने भारतासाठी आतापर्यंत 151 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये हरमनप्रीत कौरने 3058 धावा केल्या असून तिने T20 मध्ये एका शतकासह 10 अर्धशतके झळकावली आहेत. एवढेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणारी ती जगातील चौथी खेळाडू आहे.

असा आहे मुंबई इंडियन्सचा संघ-

हरमनप्रीत कौर, नटालिया स्किवर, हेली मॅथ्यूज, अमेलिया केर, पूजा वास्त्रेकर, यस्तिका भाटिया, हीथर ग्रॅहम, अमनजोत कौर, धारा गुर्जर, सयका इशाक, क्लोन ट्रेयॉन, ह्युमरा कंडाम, प्रीना बला, प्रियंका बाला, इसाबेल वोंग, सोनम यादव, नीलम बिश्‍ट