इंदापुरात महायुतीतील संघर्ष टोकाला; हर्षवर्धन पाटील यांनी उचललं मोठं पाऊल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच इंदापूरमध्ये भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यातील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या गटातील नेत्याने भर सभेत हर्षवर्धन पाटील यांच्यावर शिव्यांची लाखोली वाहिली होती. आता हर्षवर्धन पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून आपल्याला मित्रपक्षांकडूनच धमकी मिळत असल्याची तक्रार केली आहे. तसेच अशा लोकांवर योग्य ती कारवी करण्यात यावी असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हंटल.

हर्षवर्धन पाटील यांचं पत्र जसंच्या तसं –

मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे सरकार आपल्या मार्गदर्शनाखाली योग्य पध्दतीने कामकाज करीत आहे. परंतु माझ्या तालुक्यामध्ये मी आपल्या नेतृत्वाखाली राजकिय व सामाजिक जिवनात काम करत असताना इंदापूर मधील मित्र पक्षांचे काही पदाधिकारी राजकीय जाहीर मेळावे व सभांमधून माझेवरती अतिशय खालच्या पातळीवर, एकेरी व शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करीत आहेत. त्याचबरोबर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे मला माझ्या सुरक्षिततेची चिंता वाटत आहे.

सदरील बाब अतिशय गंभीर असून, आपण यामध्ये तात्काळ लक्ष घालावे. अशा गुंड प्रवृत्तींच्या लोकांना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. तरी आपण या बाबत ठोस भूमिका घेउन योग्य त्या कारवाईचे आदेश देऊन सहकार्य करावे, हि विनंती.

दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूर मतदारसंघ हा बारामती लोकसभेच्या अंतर्गत येतो. बारामतीत यंदा शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात मुख्य लढत होण्याची चिन्हे आहेत. अशावेळी अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील या दोन्ही गटातील वाद पुन्हा एकदा समोर आल्याने हर्षवर्धन पाटील युती धर्म पाळून सुनेत्रा पवार यांचे काम करणार कि अजितदादांचा वचपा काढण्यासाठी सुप्रिया सुळेंमागे आपली ताकद लावणार हे लवकरच कळेल. मात्र आधी मावळ, मग शिरूर आणि आता इंदापूरात अजित पवारांची डोकेदुखी वाढली आहे हे मात्र नक्की….