धैर्यशील मानेंचा गेम भाजपच करतंय का? हातकणंगलेच्या चौरंगी लढतीची कहाणी जाणून घेऊया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हातकणंगलेत लोकसभेच्या निमित्ताने कोण कुणाच्या गळ्यात हात टाकतंय? आणि कोण कुणाच्या पायात पाय? हे काही समजेना झालंय. पश्चिम महाराष्ट्रातल्या साखरपट्ट्यातल्या या मतदारसंघात एक-दोन नव्हे तर तब्बल पाच उमेदवार रिंगणात होते. महायुतीनं शिंदे गटातील धैर्यशील माने यांनाच तिकीट रिपीट केलं. मविआची बाहेरून पाठिंबा मिळवण्याची खेळी सपशेल फोल ठरल्यामुळे स्वाभिमानीच्याच चिन्हावर राजू शेट्टींनी मैदानात उतरण्याचं ठरवलं. शेट्टी शिवसेनेतून चिन्हावर लढायला तयार नसल्यानं ठाकरेंना सत्यजित पाटील सुरडकरांच्या हाती मशाल द्यावी लागली. वंचित आणि मविआचं फिस्कटल्यानं 2019 च्या निवडणुकीत निर्णायक ठरलेल्या आंबेडकरांनी डी. सी. पाटील यांना पुन्हा गेमlचेंजरच्या भूमिकेत ठेवत उमेदवारी दिली. त्यांनी पहिल्याच दिवशी अर्जही भरला. हा सगळा गुंता कमी होता म्हणून की काय महायुतीचे मित्र असलेले प्रकाश आवाडे यांनीही निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली. शिंदेंच्या उमेदवाराला होणारा डॅमेज पाहता प्रकाश आवाडे यांच्याशी चर्चा केली. आवाडे यांचं बंड थंड करण्यात त्यांना यशही आलं. मुख्यमंत्री आवाडेंना सोबत घेऊनच मानेंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅलीमध्ये दाखल झाले…

धैर्यशील मानें समोरचं एक आव्हान टळलं असलं तरी हातकणंगलेची लढत आजही तितकीच कडवी आहे. महायुती, महाविकास आघाडी, वंचित आणि स्वाभिमानीत होणाऱ्या या प्रमुख लढतीत काहींची प्रतिष्ठा दावणीला लागली आहे. तर अनेकांचे पॉलिटिकल करिअरही. पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्वात जास्त इंटरेस्टिंग ठरणाऱ्या हातकणंगलेच्या जागेवर नेमका कुणाचा ‘खेला होबे’ होणार? अनेक गटातटांच्या या राजकारणात कोण कुणाची मतं खाऊन कुणाला खासदार करायला मदत करणार? हातकणंगलेची जागा इतकी ट्रिकी का झालीये? त्याचाच घेतलेला हा आढावा…

Dhairyashil Mane यांचा गेम भाजपच करतंय का? हातकणंगलेच्या चौरंगी लढतीची कहाणी

हातकणंगले मध्ये आपल्याला धैर्यशील माने, सत्यजित आबा पाटील, राजू शेट्टी आणि डी. सी. पाटील अशी ही चार नावं दिसतायत. आता या चार नावांची वैयक्तिक आणि स्थानिक राजकारण फिरवण्याची ताकद नेमकी किती आहे? हे थोडं विस्तारानं पाहू…

पहिलं नाव येतं ते हातकणंगलेचे स्टॅंडिंग खासदार धैर्यशील माने

इचलकरंजीच्या राजकारणात बस्तान बांधून असणाऱ्या बाळासाहेब माने, निवेदिता माने यांच्या रूपाने धैर्यशील माने यांना वैचारिक वारसा मिळाला. धैर्यशील माने यांचे आजोबा इचलकरंजीतून म्हणजेच सध्याच्या हातकणंगलेतून तब्बल पाच वेळा खासदार होते. यावरून या घराण्याचं राजकारणातील प्रस्थ आपल्याला दिसून येतं. ग्रामपंचायत सदस्य ते खासदार असा धैर्यशील मानेंचा राजकीय प्रवास असल्याने पॉलिटिकल बेसही स्ट्रॉंग आहे. भाजपचे माजी आमदार सुजित हळवणकर यांनी केलेली पक्षाची बांधणी, आमदार प्रकाश आवाडे यांचे मताधिक्य आणि इचलकरंजी विधानसभेतून मिळणारं लीड या सगळ्या गोष्टी धैर्यशील मानेंच्या पथ्यावर पडणाऱ्या आहेत. भाजपच्या बांधणीचा फायदाही माने यांना मिळू शकतो. धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज भरताना मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली होती. यावरून हातकणंगलेची जागा शिंदेंसाठी किती प्रतिष्ठेची आहे याचा प्रत्यय येतो. त्यामुळे आपली सारी यंत्रणा मानेंच्या पाठीशी लावण्यात ते हयगय करणार नाहीत. मोदी इमेजचाही त्यांना फायदा उठवता येऊ शकतो. राम मंदिराचा मुद्दा ते शासनाने अनेक धोरणात्मक घेतलेल्या निर्णयांचा प्रचार करून माने इतर उमेदवारांपेक्षा रेसमध्ये दोन पावलं पुढे राहू शकतात…

दुसरं नाव म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे नेते सत्यजित आबा पाटील.

शिराळा आणि वाळवा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील तर हातकणंगले शिरोळ या भागातून शिवसेना ठाकरे गट व काँग्रेसची मोठी ताकद सत्यजित आबांच्या पाठीशी असणार आहे. शाहूवाडी तालुक्यात सरूडकर पाटील घराण्याचा मोठा प्रभाव आहे. बाबासाहेब पाटील सरूडकर हे या मतदारसंघात दोन वेळा विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते. बाबासाहेब पाटील सरूडकर हे शिराळा तालुक्यातील विश्वास सहकारी साखर कारखान्याचे गेली २५ वर्षे उपाध्यक्ष आहेत. त्यांचा राजकीय वारसा सत्यजित पाटील सरूडकर हे चालवत आहेत. त्यांनी सर्वप्रथम मानसिंग गायकवाड व करण गायकवाड यांचा पराभव करून विधानसभा निवडणुकीत पहिला विजय मिळवला होता. तर 2014 मध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचे माजी मंत्री विनय कोरे यांचा पराभव करत ते जायंट किलर ठरले होते.

सहकाराच्या माध्यमातून या भागात असणार महाविकास आघाडीचं नेटवर्क आणि ठाकरेंना मिळणारी सहानुभूतीची लाट हातकणंगलेत सत्यजित आबांसाठी निर्णायक ठरू शकते. धैर्यशील मानेंच्या कारभारावर नाराज असलेल्या मतदारांना राजू शेट्टींपेक्षा सत्यजित आबा पाटील जवळचे पर्याय असतील. त्यात जयंत पाटलांसारख्या मातब्बर नेत्यानं जिल्ह्यातील आपली यंत्रणा कामाला लावली, तर सत्यजित आबा पाटील यांचा विजय पक्का मानला जातोय. काही प्रमाणात सतेज पाटीलही कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडल्यामुळे त्याची परतफेड म्हणून हातकणंगलेच्या जागेवर शिवसेनेच्या उमेदवाराला मोठं बळ देऊ शकतात. एकूणच सत्यजित आबा यांच्या पाठीशी अनेक अर्थानं मोठी व्होटबँक आहे.

हातकणंगलेच्या रिलेव्हंट राजकारणातील तसं पहायचं झालं तर सर्वांना परिचित असणारा चेहरा म्हणजे राजू शेट्टी..

हातकणंगले या मतदारसंघाच्या निर्मितीनंतर 2009, 2014 या सलग दोन टर्म खासदार राहिलेल्या राजू शेट्टींनी उसाच्या जीवावर पश्चिम महाराष्ट्रात राजकारण पेरलं. स्वाभिमानीच्या जीवावर हे नाव उभ्या महाराष्ट्राला माहीत झालं. 2014 नंतर भाजपच्या गोटात गेलेल्या शेट्टींनी 2019 जवळ येईपर्यंत भाजपच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करत आंदोलनाची राळ उठवली होती. मात्र 2019 ला आघाडीच्या सपोर्टवर हातकणंगलेतून निवडणूक लढणाऱ्या शेट्टींचा वंचित मुळे गेम झाला. मोदींची लाटही शिवसेनेच्या उमेदवाराला फायद्याची ठरली आणि शिवसेनेच्या धैर्यशील मानेंनी राजू शेट्टींसारख्या दिग्गजाला पराभवाचं पाणी पाजलं. मात्र मागील काही वर्षापासून उसाच्या प्रश्नाची कोंडी फोडत शेट्टींची इमेज पुन्हा एकदा साखरपट्ट्यात झालीय. हातकणंगलेत शेती हा निवडणुकीतील महत्त्वाचा फॅक्टर ठरतो. मतदार संघात शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचाही चांगला दम आहे. राजकारणापेक्षा शेतकऱ्याच्या प्रश्नाला जास्त महत्त्व देणारा नेता म्हणून राजू शेट्टी यांची ओळख आहे. साध्या सुध्या शेतकऱ्यांच्या दमावर भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या राजू शेट्टींची ताकद म्हणूनच मविआ ओळखून होती. मात्र मशालीच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा हट्ट शेट्टींनी पुरा न केल्यामुळे आता ते स्वाभिमानीच्याच चिन्हावर निवडणूक लढताना दिसतील. याच मतदारसंघातला तीन टर्मचा अनुभव, शेतकऱ्यांची एकगठ्ठा ताकद आणि शेट्टी या नावाच्या पाठीशी असणारा हक्काचा मतदार या जमेच्या बाजू पाहता. स्वाभिमानी या निवडणुकीत टफ फाईट देऊ शकते. यावेळेस मात्र आघाडी किंवा युतीचा कुठलाही सपोर्ट नसल्यामुळे शेट्टींना आपल्या स्वाभिमानीची खरी ताकद दाखवूनच द्यावी लागेल.

वंचित कडून उभे राहिलेले आणि हातकणंगलेच्या निवडणुकीला चौरंगी स्वरूप आणणारं पुढचं नाव म्हणजे डी. सी. पाटील

2019 लाच महाराष्ट्रातल्या सर्व 48 जागांवर उमेदवार देऊन वंचितनं आपली ताकद दाखवून दिली. त्यातही हातकणंगलेच्या जागेवर अस्लम सय्यद यांनी 1 हजार 23 हजार 419 मतं मिळवत ताकद दाखवून दिली होती. राजू शेट्टींना खासदारकी पासून वंचित मुळेच वंचित राहावं लागलं होतं. यंदा वंचित आणि महाविकास आघाडीची बोलणी सुरू असल्यानं हातकणंगलेत आंबेडकर मविआच्या उमेदवाराला बळ देणार, हे निश्चित होतं. मात्र मविआसोबत खटकल्याने आंबेडकरांनी स्वतंत्र उमेदवारी द्यायला सुरू केली. आणि यात हातकणंगलेच्या निवडणुकीतही वंचितनं उडी घेतली. यावेळेस आंबेडकरांनी हेरलं डी. सी. पाटील यांना… दादासाहेब उर्फ दादगोंडा चवगोंडा पाटील यांचं हातकणंगले तालुक्यातील कुंभोज हे मूळ गाव. जैन अल्पसंख्याक समाजातून येणारे पाटील हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असून बाहुबली विद्यापीठाचे महामंत्री व बांधकाम व्यावसायिकही म्हणून ते काम पाहतात. हातकणंगले मतदारसंघात जातीचं, सहकाराचं राजकारण करू पाहणाऱ्या आंबेडकरांनी डी. सी. पाटील यांच्या रूपाने जिल्ह्याच्या राजकारणात वावर असणारा चेहरा लोकसभेच्या मैदानात उतरवला आहे. आपण मतं खाण्यासाठी नाही, तर निवडून येण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरलोय. अशा कॉन्फिडन्सने त्यांचा प्रचार चालू असल्यामुळे हातकणंगलेमध्ये यंदाही वंचित गेमचेंजरच्या भूमिकेत राहणार का, हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे…

या सगळ्याचा विचार करता सत्ताधारी युतीच्या पाठिंब्यावर धैर्यशील माने खासदारकीची डबल टर्म मिळवणार, आपला स्वाभिमान कायम ठेवत बच्चू कडू स्वतंत्रपणे आपली ताकद दाखवून देणार, सत्यजित आबा पाटील ठाकरेंची मशाल मतदारसंघात तेवती ठेवणार की वंचित मुसंडी मारत सर्वांना धक्का देणार? तुम्हाला यातली नक्की कोणती शक्यता खरी होताना दिसतेय? हातकणंगलेत यंदा खासदार होण्याचे कुणाचे चान्सेस जास्त आहेत? तुमचा अभ्यास काय सांगतो? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.