पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गर्भवती महिलेच्या मृत्यूची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणानंतर, वैद्यकीय शिक्षणमंत्री माधुरी मिसाळ यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यांनी घोषणा केली की, प्रत्येक रुग्णालयात आरोग्यदुताची नेमणूक केली जाईल, ज्यामुळे भविष्यात असे अनिष्ट प्रकार टाळता येतील.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्यूची चौकशी सुरू केली जाईल. महिलेच्या कुटुंबीयांकडून आरोप करण्यात आले की, आर्थिक अडचणीमुळे वेळेत उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, मंत्री मिसाळ यांनी आरोग्य दूतांच्या नियुक्तीसह, धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या अंतर्गत रुग्णालयांच्या कामकाजावर देखरेखीची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्या दिवशी काय घडले ?
सुशांत भिसे यांच्या बहिणी प्रियांका पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, आम्ही सकाळी ९ वाजता मंगशेकर रुग्णालयात गेलो. तिथे डॉक्टर घैसास यांनी प्राथमिक तपासणी केल्यानंतर बीपी वाढल्याचे सांगितले. तिथून त्यांनी नव्या इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर वहिनीला शिफ्ट करण्यास सांगितले. तिथे असेसमेंट रुममध्ये दुसरे डॉक्टर आले. त्यांनी परिस्थिती गंभीर असल्याची जाणीव करून दिली. सिझर करावे लागेल, त्यामुळे काही खाऊ-पिऊ नका, असे सांगितले. सिझरची तयारीही त्यांनी केली, रुग्णाचे कपडे घालायला दिले. त्यानंतर डॉक्टर घैसास आले, त्यांनी परिस्थिती गंभीर असल्याचे म्हटले. रक्तस्राव होत असल्यामुळे लगेचच शस्त्रक्रिया करावी लागेल, असे सांगितले.प्रियांका पाटील म्हणाल्या, “सातव्या महिन्यात प्रसूती होत असल्यामुळे बाळांना NICU मध्ये ठेवावे लागेल, असे सांगितले. दोन्ही बाळांचा प्रत्येकी दहा लाख असा वीस लाखांचा खर्च होईल, असेही ते म्हणाले. मात्र आम्ही विनंती केल्यानंतर त्यांनी दहा लाख आता भरण्यास सांगितले. पैसे भरणे शक्य नसल्यास तुम्ही ससूनला जाऊन उपचार घेऊ शकता, असेही म्हटले. हे सर्व आमची वहिणी तनिशा भिसे यांच्यासमोरच सांगितल्यामुळे वहिणीच्या मनावर दबाव आला. आधीच रक्तस्राव, उच्च रक्तदाब असल्यामुळे वहिनीची परिस्थिती नाजूक होती, त्याच खर्चाचा आकडा पाहून ती अशरक्षः कोसळली. वहिनी तिथेच रडायला लागली.”
आम्ही पैशांची व्यवस्था करतो, अशी विनंती वारंवार करत होतो. रुग्णाच्या मनाला समाधान मिळेल यासाठी तरी उपचार सुरू करा, असेही म्हणालो. पण रुग्णालयाने रस्तस्राव थांबविण्याचा प्रयत्न केला नाही. आधीच्या रुग्णालयातून मिळालेली गोळीच खा, असे उत्तर दिले.




