विशेष प्रतिनिधी । राज्यातील विविध शासकीय रुग्णालयांत शल्यचिकित्सक, प्रसूतीतज्ञ, फिजिशियन्स आणि बालरोगतज्ज्ञ या विशेष सेवा देणाऱ्या डॉक्टरांची एकूण ६४३ पदे रिक्त असल्याने आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम होत आहे. या रिक्त जागा भरण्याचे शासनाचे आश्वासन हवेतच विरले असून शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा पोहचल्याचा शासनाचा दावा पोकळ ठरत आहे.
राज्यात २३ जिल्हा रुग्णालये, ८५ उपजिल्हा रुग्णालये, ११ स्त्री रुग्णालये, एक अस्थिरोग रुग्णालय, ३६३ ग्रामीण रुग्णालये, ६८ ट्रॉमा केअर युनिट, ३ विभागीय संदर्भ रुग्णालये व १८११ प्राथमिक आरोग्य केंद्र अशा एकूण २ हजार ३६४ शासकीय रुग्णालयांच्या माध्यमातून आरोग्य सेवा दिली जाते. विशेष तज्ञांच्याच जागा रिक्त असल्याने आरोग्य सेवा देण्याचा उद्देश पूर्ण होत नाही. विशेषज्ञांची एकूण १५९७ पदे मंजूर असून त्यापैकी ९४५ पदे भरलेली आहेत आणि ६४३ पदे रिक्त आहेत.
जागा रिक्त असल्याने कामावरील डॉक्टरांवर कामाचा अतिरिक्त ताण आहे. त्यामुळेही योग्य आरोग्य सेवा देण्यास ही रुग्णालये कमी पडत आहेत. शासकीय रुग्णालयांत डॉक्टरांना तुटपुंजे वेतन मिळत असल्याने येथे येण्यास विशेषज्ञ तयार होत नाहीत. शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचे वेतन वाढवावे व अन्य सुविधा द्याव्यात अशी डॉक्टरांची मागणी आहे.