पुणे प्रतिनिधी। पुणे शहरात मध्यरात्रीपासून जोरदार पावसाला सुरवात झाली असून गेल्या तीन तासांपासून पुणे शहर व अन्य उपनगरांमध्ये देखिल मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार कोसळणाऱ्या सरींमुळे शहरात अनेक भागात रस्त्यांवर पाणी वाहत आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज विदर्भासह मराठवाड्यात सर्वदूर पावसाचे अंदाज असून अनेक ठिकाणी मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरु झाला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी बुधवारी व गुरुवारी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
महाराष्ट्रात हवामान अंदाजानुसार अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, भंडारा, बीड, बुलडाणा, चंद्रपूर, धुळे, नागपूर, नांदेड, नाशिक, उस्मानाबाद, परभणी, पुणे, सांगली, सातारा, आणि यवतमाळ येथे काही ठिकाणी २४ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. त्यानुसार येथील अनेक भागात पावसाला सुरवात झाली आहे. नाशिक, बीड परिसरात मध्यरात्री पासून जोरदार पाऊस पडत आहे. येत्या २४ तासात महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.