हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि जवळपास सगळ्याच पातळींवर फारशी उत्साही आकडेवारी न दिसणारा नंदुरबार जिल्हा…उत्तर महाराष्ट्राच्या एका टोकाला असणारा या जिल्ह्याची आदिवासी बहुल म्हणून ओळख आहे. मागासलेल्या जिल्ह्यांच्या यादीत टॉप करणाऱ्या या जिल्ह्याचं राजकारणही टॉपचंच राहिलंय. स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच काँग्रेसचे विचारांचा खासदार निवडून देण्याचा या जिल्ह्याचा इतिहास राहिलाय. अगदी डोळेझाकपणे निवडून येणाऱ्या काँग्रेसचा हा बालेकिल्ला मात्र 2014 ला फुटला…आणि यानंतर या मतदारसंघावर काँग्रेसचाच एक कलमी कार्यक्रम चाललाय. मात्र 2019 मध्ये सत्ताधारी भाजपचा उमेदवार निवडून आला असला तरी त्याचं मताधिक्य कमालीचं घटल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत नंदुरबारच्या जागेवर (Nandurbar Lok Sabha 2024) काँग्रेस अद्याप प्रचंड आशावादी आहे.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुड बुक मधील खासदार अशी ओळख असलेल्या डॉ. हिना गावित या जागेवर विजयाची हॅट्रिक करणार का?कि काँग्रेस या ठिकाणी बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष्य आहे.
1967 ला काँग्रेसचे तुकाराम गावित या मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आले. यानंतर 1977 चा सुरुपसिंग नाईक यांचा अपवाद वगळता 1980 पासून 2014 पर्यंत सलग नऊ वेळा खासदार होण्याचा मान माणिकराव गावित यांच्या पदरात पडला. एकाच मतदारसंघातून कुणी इतक्या वेळा निवडून जाण्याचा हा तसा रेकॉर्डच म्हणावं लागेल… त्यामुळे 2014 ची निवडणूक आल्यानंतर मोदी लाट असली तरी नंदुरबार काही केल्या हातून निसटणार नाही याचे होप्स कायम होते…ही निवडणूक गाजली ती गावित विरुद्ध गावित या संघर्षामुळे! तब्बल नऊ टर्म खासदार राहिलेल्या काँग्रेसच्या माणिकराव गावित यांच्या विरोधात निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या विजयकुमार गावित यांच्या सुकन्या डॉक्टर हिना गावित भाजपच्या तिकिटावर मैदानात उतरल्या होत्या. त्यामुळे पुऱ्या महाराष्ट्राच्या नजरा नंदुरबारमध्ये नेमकं काय होणार? याकडे लागल्या होत्या…निकाल लागला आणि अनपेक्षितपणे काँग्रेसच्या या प्रस्थापित उमेदवाराला नवख्या हिना गावित (Heena Gavit) यांनी आस्मान दाखवलं होतं.
2014 मध्ये हिना गावित पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. त्यावेळी गावित या संसदेतील सर्वात तरुण खासदार ठरल्या होत्या. त्यावेळी त्यांचं वय अवघं 26 वर्षे होतं. नंदुरबार जिल्ह्यात डॉ. विजयकुमार गावित यांची कार्यकर्त्यांची स्वतंत्र फौज आहे. त्यांचा शब्द प्रमाण मानत ते ऐनवेळी कोणत्याही पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन निवडणूक रणांगणात उतरतात, असे मानले जाते. त्यांच्या याच फौजेने कन्या डॉ. हीना यांचा लोकसभा विजय सुकर केला. 2019 मध्येही भाजपनं पुन्हा एकदा डॉ. हिना गावित यांच्यावरच विश्वास टाकला. मात्र यावेळेस त्यांची फाईट होती ती काँग्रेसचे मतदारसंघातील मुरलेले नेते के. सी. पाडवी यांच्यासोबत! मात्र रिझल्ट सेम टू सेम…. डॉ. हीना गावित मोदी लाटेत पुन्हा एकदा निवडून आल्या होत्या. मात्र यावेळेस भाजपने इतर मतदारसंघात मोठी लीड घेतलेली असताना नंदुरबारचं लीड मात्र बरंच घटलं होतं. त्यामुळे थोडं मैदान मारलं आणि मतांचं गणित जुळवून आणलं तर भाजप विरुद्ध काँग्रेस अशी सरळ थेट लढत होणाऱ्या नंदुरबारमध्ये यंदा कडवी झुंज पाहायला मिळू शकते…
खासदार म्हणून पहिल्याच टर्ममध्ये हीना गावित यांनी संसदेत आपली छाप पाडली होती. पहिल्या टर्ममधील पाच वर्षात हीना गावित या सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या आघाडीच्या खासदारांपैकी एक होत्या. त्यांनी महाराष्ट्रातील ज्येष्ठ खासदारांच्या बरोबरीने राज्याच्या समस्या संसदेत मांडून दाखवल्या होत्या. इतकंच काय तर नरेंद्र मोदी यांच्याही गुड बुक मध्ये त्यांचं नाव नेहमीच पाहायला मिळतं. दुसरीकडे हिना गावित यांना पक्षांतर्गत विरोध बराचसा होतोय. सहकारी पक्षांच्या नेत्यांचा निधी अडवला जाण्याचा आरोप त्यांच्यावर अनेकदा होत असतो. शिंदे गटाचे संपर्क प्रमुख माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी टोलमुक्त असणारा खासदार द्यावा अशी मागणी करत अप्रत्यक्ष उमेदवार बदलाचं समर्थन केलय. मात्र असं असलं तरी भाजपकडून मात्र पुन्हा एकदा डॉ. हिना गावित यांनाच उमेदवारी दिली जाईल असं राजकीय विश्लेषक सांगतायत. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये हि जागा काँग्रेसला सुटली असून याठिकाणी के. सी. पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी यांना मैदानात उतरवलं आहे. त्यांच्या मागे महाविकास आघाडी आणि काँग्रेसची संपूर्ण ताकद उभी असेल. गोवाल पाडवी यांनी वकिलीचं शिक्षण मुंबईमधून पूर्ण केलं असून मुंबई उच्च न्यायालयात ते सध्या वकिली करत आहेत. त्यामुळे नंदुरबारमध्ये वकील विरुद्व डॉक्टर अशी लढत पाहायला मिळेल.
नंदुरबार लोकसभा हा प्रामुख्याने नंदुरबार आणि धुळे या दोन जिल्ह्यात विभागला गेलाय. नंदुरबारमधील 4 तर धुळ्यातील 2 विधानसभा मतदारसंघाचा यात समावेश होतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मतदारसंघातील सर्वच विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. यामध्ये काँग्रेसचे दोन शिंदे गटाचा एक तर भाजपकडे तीन मतदारसंघ आहे. त्यामुळे पक्षीय बलाबलाचा विचार केला तर नंदुरबारमध्ये आजमितीला महायुतीचं पारड जड असल्याचं पाहायला मिळतं. नंदुरबार मतदार संघात भाजपाचे नेते आणि विद्यमान मंत्री डॉ. विजयकुमार गावित शहादा तळोदा मतदारसंघात भाजपाचे राजेश पाडवी आमदार आहेत. तर शिरपूर मतदारसंघात भाजपाचे काशिराम पावरा हे आमदार आहेत. अक्कलकुवा विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के सी पाडवीहे आमदार आहेत. नवापूरमध्ये आमदार शिरीष नाईक हे आमदार आहेत. तर साक्री विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या मंजुळा गावित या सध्या विद्यमान आमदार आहेत…
त्यामुळे तसा भाजपकडे शिफ्ट झालेला हा मतदारसंघ पुन्हा आपल्याकडे खेचून आणण्यासाठी काँग्रेसला इतर घटक पक्षांची साथ सोबतच वंचितचाही आधार घ्यावा लागेल. डॉ. हिना गावित यांना सर्वच दृष्टीने वरचढ ठरेल. मात्र राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही, त्यामुळे पूर्ण करणार कि नवखे गोवाल पाडवी हिना गावित याना धोबीपछाड देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष्य असेल.