हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तिकीट वाटपापासून ते प्रत्यक्ष मतदान होईपर्यंत नाशिक लोकसभा मतदारसंघाचा ड्रामा हा जबरी राहिला.. ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे, शिंदे गटाकडून हेमंत गोडसे तर अपक्ष शांतिगिरी महाराज यांच्यातल्या या तिरंगी लढतीकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं.. मतदानाच्या दिवशीही नाशिकमध्ये बराच राडा झाला… बोगस मतदान, आमदारांच्यातील बाचाबाची आणि शांतिगिरी महाराजांवर दाखल झालेला गुन्हा यामुळे नाशिकचं मतदान वादळी राहिलं. नाशिकचं मतदान तर झालंय… निकाल एव्हीएममध्ये बंद ही झालाय… पण आता सगळीकडे चर्चा आहे ती निवडून कोण येणार याची? लढत घासून होणार असली तरी नाशकात मशालच पेटणार असं बोललं जातंय… संपूर्ण प्रचारात आणि मतदानाच्या दिवशीही नाशिकात राजाभाऊ वाजे यांच्याच नावाची चर्चा का राहिली? शांतीगिरी महाराज यांनी अपक्ष उभं राहून नेमका कुणाचा गेम केला? कालच्या मतदानात निकाल कुणाच्या बाजूने झुकलेला दिसतोय? धनुष्यबाण की मशाल? याचंच डिकोडींग करुयात
मतदानासाठी नाशिकमध्ये नागरिकांनी सकाळी सात वाजल्यापासूनच मतदानाच्या रांगा लावल्या होत्या. यामुळे नाशिकमध्ये निवडणूक लोकांनी हातात घेतलीय असं बोललं गेलं. शांतिगिरी महाराजांनी मतदान झाल्यानंतर मतदान कक्षाला गळ्यातील हार घातल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला… राजाभाऊ वाजे यांच्यासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या… तर आजी-माजी आमदारांच्यातील बाचाबाची मुळे नाशिकचं वातावरण मतदानाच्या दिवशी बरंच तणावाचं होतं. काही ठिकाणी बोगस मतदान आणि पैसे वाटल्याचे प्रकारही आढळून आले. शेवटी सायंकाळी 5 वाजेपर्यंत नाशकात 51. 16 टक्के मतदानाचा आकडा नोंदवण्यात आला. त्यातही शहरी पट्टयात कमी तर ग्रामीण भागात जास्त असा मतदानाच्या टक्केवारीचा पॅटर्न आढळून आला… आणि इथंच ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे निवडून येतील याचा अंदाज फिट्ट बसला… कारण नाशिक शहरात भाजपची ताकद जास्त होती. हिंदुत्ववादी मतांचा टक्काही नाशकात जास्त आहे. या मतांच्या कन्वर्जनवर गोडसेंची मोठी मदार होती. पण तिथूनच सर्वात कमी मतदान झाल्यामुळे हा गोडसेंसाठी मोठा पॉलिटिकल लॉस आहे…
मतदानासाठी उदासीन असणारा हा मतदार अर्थात भाजपचा होता, तो मतांमध्ये कन्व्हर्ट न झाल्यामुळे राजाभाऊ वाजे यांचं वजन मतदानानंतर वाढताना दिसतंय. दुसरा मुद्दा असा की राजाभाऊ वाजे ज्या मतदारसंघातून येतात त्या सिन्नरमध्ये सर्वाधिक म्हणजे 58.70 टक्के मतदानाची नोंद झाली. शेजारच्या इगतपुरी मध्येही मतदानाची आकडेवारी 57 टक्केंच्या आसपास राहिली. ग्रामीण पट्टयातील मतदानाचा हा वाढता आकडा वाजे यांना दिल्लीपर्यंत घेऊन जाण्यासाठी पुरेसा ठरणार आहे… ग्रामीण भागात पहिल्यांदाच आपला माणूस खासदार होणार, ही भावना तीव्र होती. त्यामुळे वाजेंना मतदान करण्यासाठी मतदारांनी सकाळपासून रांगा लावल्या होत्या.
शांतिगिरी महाराजांना भाजपाचा बॅक सपोर्ट असल्याच्या अनेक वावड्या नाशिक शहरात उठल्या… संपूर्ण प्रचार प्रक्रियेत हेमंत गोडसे आणि त्यांची शिवसेना एकटे दिसले… भाजपची इथे हक्काची व्हॉट बँक असतानाही त्यांचे कार्यकर्ते उदासीन दिसले. सेम गोष्ट अजित पवारांच्या राष्ट्रवादीचीही ठरली. भुजबळ यांची नाशिकमध्ये मोठी ताकद असतानाही त्यांचा मतदारसंघातील सायलेन्स बरंच काही सांगून जाणारा ठरला… याउलट काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वाजेंना निवडून आणण्यासाठी खांद्याला खांदा लावून काम करताना दिसले… ग्रामीण पट्टा, मुस्लिम – दलित व्होटर, वंजारी, माळी या सायजेबल जातींचा सपोर्टही वाजेंच्याच बाजूने मतदानाच्या दिवशी दिसला. हे सगळं पाहता गोडसे यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का म्हणावा लागेल…
साधा सदरा, गळ्यात मफलर असा लुक असल्याने विरोधकांनी वाजेंना उमेदवारीनंतर हलक्यात घेतलं होतं. खासदाराला इंग्रजीतून बोलावं लागतं असं म्हणत त्यांच्या अबिलिटी वरच शंका घेण्यात आली होती. त्यावर राजाभाऊंनी खटक्यावर बोट जाग्यावर पलटी या न्यायाने विरोधकांना उत्तर देत चांगलीच अद्दल घडवली होती. माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने येऊन इंग्रजीतून चर्चा करावी. मी त्यांच्या सर्व प्रश्नांचे उत्तरे देईन. अगदी ग्रॅमॅटिकली व शुद्ध इंग्रजी भाषेत मी चर्चा करायला तयार आहे. त्यात थोडी जरी चूक झाली किंवा कोणी शोधली, तर मी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही… राजाभाऊंनी दिलेल्या या आव्हानामुळे विरोधक गपगार पडले आणि राजाभाऊंना नाशिकमध्ये यामुळे मोक्कार पब्लिसिटी मिळून गेली. थोडक्यात वाजे हे प्रचाराच्या प्रत्येक टप्प्यात गोडसेंपेक्षा उजवे राहिले… दूसरीकडे अगदीच रडत खडत उमेदवारी मिळाल्याने महायुतीच्या प्रचारात म्हणावी इतकी रग नव्हती. त्याचंच रिफ्लेक्षण मतदानाच्या दिवशीही जर पडताना दिसलं तर गोडसे यांचा करेक्ट कार्यक्रम होऊन 4 जूनला निकाल वाजेंच्या बाजूने झुकलेला दिसेल. थोडक्यात नाशिकात गुलाल हा साध्यासुध्या राजाभाऊ वाजे यांच्या कपाळाला लागतोय, असा एकंदरीत कल आहे. बाकी नाशिकचा उमेदवार म्हणुन तुमची पसंद कुणाला? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.