सर्वात मोठी बातमी!! काँग्रेसच्या 6 आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिमाचल प्रदेश राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्यामुळे अपात्र केलेल्या काँग्रेसच्या ६ आमदारांनी आज भाजपमध्ये (Congress MLA’s Joined BJP) प्रवेश केला आहे. या आमदारांमध्ये काँग्रेसचे सुधीर शर्मा, रवी ठाकूर, राजेंद्र सिंह राणा, चैतन्य शर्मा, देवेंद्र भुट्टो, इंदर दत्त लखनपाल यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली आहे.

खरं तर राज्यसभा निवडणुकीत सुधीर शर्मा, रवी ठाकूर, राजेंद्र राणा, इंदर दत्त लखनपाल, चैतन्य शर्मा आणि देवेंद्र कुमार भुट्टो या सहा आमदारांनी बंडखोरी करत भाजपच्या बाजूने मतदान केलं होते. त्यामुळे या ६ बंडखोर आमदारांना हिमाचल प्रदेशचे सभापती कुलदीप सिंह पठानिया यांनी २९ फेब्रुवारी रोजी अपात्र ठरवले होते. यापूर्वीच निवडणूक आयोगाने त्यांच्या मतदारसंघातील पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. त्यामुळे हे बंडखोर आमदार पुन्हा निवडुन येतात का ते पाहावं लागेल.

राज्यसभा निवडणुकीत काय घडलं होते?

हिमाचल प्रदेशात राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणूक झाली होती.काँग्रेसने याठिकाणी अभिषेक मनु सिंघवी याना उमेदवारी दिली होती. तर भाजपकडून हर्ष महाजन यांना तिकीट देण्यात आलं होते. विजयासाठी 35 आमदारांच्या मतांची गरज होती. हिमाचल प्रदेशात काँग्रेसचे ४० आमदार असल्याने अभिषेक मनु सिंघवी यांचा विजय निश्चित होता, मात्र मतदानाच्या दिवशी भलतंच घडलं. काँग्रेसच्या 6 आमदारांनी क्रॉस व्होट केले. तीन अपक्ष आमदारांनीही भाजप उमेदवाराच्या समर्थनार्थ मतदान केले. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना 34-34 मते मिळाली. अखेर चिट्टीद्वारे भाजपच्या हर्ष महाजन याना विजयी करण्यात आले.