कोल्हापूरात दगडफेक, पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज; हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियातून आक्षेपार्ह मेसेज व्हायरल केल्याप्रकरणी कारवाई व्हावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. मोठ्या संख्येने संघटना रस्त्यावर उतरली असून बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळात आहे. दरम्यान, हिंदुत्ववादी संघटनांचे हजारो कार्यकर्ते छत्रपती शिवाजी चौकात जमून संशयितांवर कडक कारवाई करण्याची मागणी करीत आहेत. काही कार्यकर्त्यांनी बिंदू चौक आणि गंजी गल्ली परिसरात परिसरात दगडफेक केल्याने पोलिसांना जमाव पांगवण्यासाठी लाठीमार करावा लागला. त्यामुळे कोल्हापुरात सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

कोल्हापुरात होत असलेल्या आंदोलनामुळे सकाळपासूनच शहरातील सर्व बाजारपेठांमधील दुकाने बंद ठेवण्यात आलेली आहेत. सकाळी दहापासून हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी चौकात गर्दी केली. आक्षेपार्ह स्टेटस ठेवून राष्ट्रपुरुषांच्या बदनामीचे मेसेज व्हायरल करणा-यांवर कडक कारवाईची मागणी केली. तसेच पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ४०० ते ५०० तरुण गल्लीत घुसल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला.

येथील गंजी गल्ली आणि बिंदू चौकात काही घरांवर दगडफेड झाल्यामुळे पोलिसांनी जमावावर लाठीमार केला. जमाव नियंत्रित करताना पोलिसांची दमछाक झाली. शहरातील परिस्थिती तणावपूर्ण बनत असल्याने पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांना चर्चेसाठी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात बोलवले असून, सध्या पोलिस अधिकारी आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये बैठक सुरू आहे. दरम्यान, बिंदू चौकात तणाव निर्माण झाला असून, पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.