हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक अशी ठिकाणे आहेत कि ती अजूनही पुनरुज्जीवनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्या ठिकाणाकडे पुरातत्व विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. मात्र, आज जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून साताऱ्यात ‘जिज्ञासा’ संस्थेच्या सदस्यांनी किल्ले अजिंक्यतारा किल्ल्यास भेट दिली. तसेच यावेळी मंगळाई देवीच्या आवारात असलेल्या जंगली श्वापद पकडण्याच्या ऐतिहासिक दगडी पिंजऱ्याचे पुनरुज्जीवन करण्याचा संकल्पही करण्यात आला.
सातारा येथील जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्था, लालबहादूर शास्त्री महाविद्यालय, कला व वाणिज्य महाविद्यालय, महादरे इकॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट व महाराणी येसूबाई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज वारसा सहलीचे आयोजन करण्यात आले. या सहलीचे ठिकाणही खास असे ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ला निवडण्यात आले. यावेळी संस्थेच्या सदस्याबरोबर युवकांनी किल्ले अजिंक्यताराच्या पूर्व उतारावर असलेल्या मंगळाई मंदिराजवळ जंगली श्वापदे पकडण्यासाठी बांधलेल्या दगडी पिंजऱ्यास भेट दिली.
दगडी पिंजऱ्याबाबत सांगायचे झाले तर हा पिंजरा इतिहासकाळात बांधण्यात आला. त्याच्या काळासंबंधीचा निश्चित पुरावा उपलब्ध नसला तरी त्याच्या स्थापत्यावरून त्याचे बांधकाम शाहू महाराजांच्या कारकिर्दीत झाले असावे, असे दिसते. अशा या ऐतिहासिक गोष्टींचे संवर्धन व्हावे, असे आवाहन वारसा सहलीच्या माध्यमातून करण्यात आले. या आवाहनास प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी श्रमदानातून दगडी पिंजऱ्याचे पुनरुज्जीवन करण्याची इच्छा व्यक्त केली.
या दगडी पिंजऱ्याच्या अनुषंगाने ‘मेरी’ संस्थेचे प्रवर्तक मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे यांनी ‘वन्यजीव व मानवी वसाहतींचा इतिहास’ याबाबत मार्गदर्शन केले. वारसा सहलीसाठी जिज्ञासाच्या सर्व पदाधिकाऱ्यांबरोबरच कला व वाणिज्य कॉलेजचे प्रा. राजेंद्र सातपुते, प्रा. गौतम काटकर तसेच लालबहादूर शास्त्री कॉलेजचे प्रा. दीपक जाधव, प्रा. प्रतिभा चिकमठ, डॉ. रवींद्र चव्हाण, प्रा. संदीप पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. जागतिक वारसा दिनानिमित्त आज ऐतिहासिक दगडी पिंजऱ्याच्या पुनरुज्जीवनाचा निर्णय घेण्यात आला.