हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात ठिकठिकाणी आज मुसळधार पावसाचा (Maharashtra Rain) इशारा देण्यात आला आहे. मागच्या २ दिवसांत धुव्वाधार पावसामुळे आधीच नद्या नाले ओसंडून वाहू लागले आहेत. रस्त्यावर पाणी साचत आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. आज सुद्धा महाराष्ट्रात अशाच प्रकारे पावसाची बॅटिंग बघायला मिळेल. खास करून कोकण किनारपट्टीला पावसाचा मोठा फटका बसू शकतो. रायगड जिल्ह्याला (Raigad) तर हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने रायगड जिल्ह्यातील शाळा आणि कॉलेजला आज सुट्टी जाहीर केली आहे.
रायगड जिल्ह्यातील काही भागांमध्ये कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबतचे पत्रक जारी केले आहे. त्यानुसार, अलिबाग, रोहा, तळा, महाड आणि पोलादपूर या तालुक्यांतील शाळांना सुट्टी लागू असेल. यामध्ये अंगणवाडी, सरकारी, खाजगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित, विनाअनुदानित शाळा, आश्रमशाळा, महाविद्यालये आणि व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रांचा समावेश आहे.
दरम्यान, रायगड जिल्ह्याला आज हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. अलिबाग, रोहा ,तळा, महाड पोलादपूर. या तालुक्यांत मागील काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मे आणि जून महिन्यात झालेल्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील धरणांमधील पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे, रायगड जिल्ह्यातील लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या 28 प्रकल्पामध्ये 60 टक्के पाणी साठा जमा झाला आहे. तर सुतारवाडी, उन्हेरे, पाभरे, संदेरी खिंडवाडी, भिलवले, कोंडगाव, कोथुर्डे आणि खैरेही 9 धरणे पूर्ण क्षमतेनी भरली आहेत.