आळंदीला निघालेल्या पालखीचा भीषण अपघात; 4 वारकऱ्यांचा मृत्यु तर 9 जण जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| संगमनेर तालुक्यातील पुणे – नाशिक महामार्गावर शिर्डीतील श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर ट्रस्टचे ह.भ.प. काशिकानंद महाराज यांच्या शिर्डी ते आळंदी पालखीचा भीषण अपघात झाला आहे. पालखी आळंदीकडे जात असताना तिला भरधाव कंटेनरने धडक दिल्यामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच तब्बल 9 वारकरी जखमी झाले आहेत. सध्या या वारकऱ्यांवर संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना रविवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी कंटेनर चालकाला अटक केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, दरवर्षी शिर्डीतील श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर ट्रस्टचे ह.भ.प. काशिकानंद महाराज शिर्डी ते आळंदी श्री साईबाबा पालखी सोहळा आयोजित करतात. यावर्षीचा हा पालखी सोहळा 37 वा होता. त्यामुळे या पालखी सोहळ्यात 250 ते 300 वारकरी सहभागी झाले होते. परंतु ही पालखी पुणे – नाशिक महामार्गावरील 19 मैल येथे पोहचली असतात तिचा भीषण अपघात झाला.

गुरुवारी शिर्डीतून आळंदीच्या दिशेने रवाना झालेली पालखी रविवारी संगमनेर तालुक्यातील पुणे – नाशिक महामार्गावरील 19 मैल येथे पोहचली होती. याचवेळी सायंकाळच्या सुमारास एक भरधाव कंटेनर पालखीत शिरला. या भीषण अपघातामुळे चार वारकऱ्यांचा मृत्यु झाला. तर नऊ वारकरी गंभीर जखमी झाले. जखमी झालेल्या या वारकऱ्यांवर संगमनेर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुख्य म्हणजे, कंटेनर चालक नशेत असल्यामुळे ही भीषण दुर्घटना घडल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब नाथा जपे (कनकुरी), बाळासाहेब अर्जुन गवळी (मढी बु,ता.कोपरगाव), बबन पाटीलबा थोरे (द्वारकानगर,शिर्डी), ताराबाई गंगाधर गमे (कोऱ्हाळे,ता.राहता) अशी मृत्यू झालेल्या वारकऱ्यांची नावे आहेत. दरम्यान, या दुर्घटनेनंतर काही वेळासाठी महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तसेच, संतप्त झालेल्या लोकांनी कंटेनरची तोडफोड केली.