औरंगाबाद | अल्पसंख्याक विद्यार्थिनींसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये वसतीगृह उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत 2010 पासून सरकारकडे पाठपुरावा सुरू होता. आता चालू महिन्यात राज्यात दहा ठिकाणी वसतीगृह उभारण्यासाठी 1 कोटी 64 लाख 70 हजार रुपयांचे अनुदान अल्पसंख्याक विभागाकडून देण्यात आले आहे.
औरंगाबाद, रायगड, जालना, परभणी आणि चंद्रपूर येथील जिल्हाधिकाऱ्यांनी अल्पसंख्याक विद्यार्थिनींसाठी वसतिगृहे उभारण्यात यावी यासाठी प्रस्ताव सरकारकडे पाठवले होते.
राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी वस्तीग्रह उभारण्याचा निर्णय 2 मार्च 2010 रोजी घेण्यात आला होता. राज्यातील विविध विद्यापीठांमधील जागेवर वसतीगृह उभारण्या संदर्भात 20 डिसेंबर 2011 रोजी सरकारने निर्णय दिला होता. यानंतर पाच वर्षांनी महाविकास आघाडी सरकारने परत या प्रक्रियेकडे लक्ष देत, सरकारने अनुदानाचेच वितरण 27 ऑगस्ट रोजी केले. त्याचबरोबर दहापैकी पाच वस्तीगृह हे एकट्या परभणी जिल्ह्यात उभारण्यात येणार आहेत.
वसतिगृहांसाठी पनवेल रायगड येथील शासकीय अल्पसंख्याक मुलींच्या वसतीगृहासाठी 16 लाख रुपये, घनसावंगी, जालना येथील अल्पसंख्याक मुलींच्या वसतिगृहासाठी 17 लाख 30 हजार, परभणी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी 15 लाख 30 हजार, गंगाखेड परभणी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी 15 लाख 30 हजार, सेलू-परभणी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी 17 लाख 30 हजार, जिंतूर-परभणी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था 17 लाख 30 हजार, पुर्णा- परभणी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी 17 लाख 30 हजार, चंद्रपूर येथील शासकीय अल्पसंख्याक मुलींच्या वसतिगृहासाठी 14 लाख 30 हजार, औरंगाबाद येथील शासकीय अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह, शासकीय विज्ञान संस्था यासाठी 17 लाख 30 हजार एवढा निधी देण्यात आला आहे.