सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सरकारने घातलेली बंदी झुगारुन बीफ विक्री करणारी सदरबझार येथील दोन हॉटेल्स सातारा नगपालिकेने सील केली. सदरबझार येथील कत्तलखाना परिसरात हॉटेल बिस्मिल्लाह तसेच हॉटेल मदिनामध्ये बंदी घातलेल्या बीफची विक्री होत असल्याची तक्रार सातारा नगरपालिकेकडे आली होती. त्या अनुषंगाने नगरपालिकेचा अतिक्रमण विभाग तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष जावून हॉटेलची तपासणी करत कारवाई केली.
यावेळी पथकास बीफ विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. हॉटेल मालक बेपारी आणि कुरेशी यांच्याकडे चौकशीही करण्यात आली. बीफ विक्रीस सरकारने बंदी घातली असतानाही त्याची विक्री होत असल्याने अधिकाऱ्यांनी ही दोन्ही हॉटेल्स सील केली. अतिक्रमण हटाव विभाग प्रमुख प्रशांत निकम, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक प्रकाश राठोड यांच्या पथकांनी ही कारवाई केली.
अनाधिकृत 30 शेडस् हटविली
अतिक्रमण हटाव पथकाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाबाहेर असलेल्या एजंटांच्या शेडवरही कारवाई केली. सतत अतिक्रमणे केली जात असून त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. शिवाय पार्किंगचीही समस्या असल्यामुळे या परिसरातील नागरिकांकडून तक्रारी येत होत्या. आरटीओ कार्यालयाबाहेर एजंटांनी अनाधिकृतरित्या उभारलेली ३० शेडस् अतिक्रमण हटावच्या पथकाने हटवली.