स्वतःचं हक्काचं घर असावं, हे प्रत्येकाचं स्वप्न! पण या स्वप्नाची किंमत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आधीच अव्वाच्यासव्वा दर असलेल्या घरांच्या किंमती आता आणखीनच वाढणार आहेत. कारण राज्य सरकारने रेडीरेकनर दरांमध्ये वाढ जाहीर केली आहे. यामुळे घरांच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तर जमीन घेणे सुद्धा महाग होणार आहे. दुसरी विशेष बाब म्हणजे हे दर आज मंगळावर दिनांक १ एप्रिल पासूनच लागू होणार आहेत.
राज्यात किती वाढ?
सरासरी 4.39% इतकी रेडीरेकनर दरवाढ जाहीर झाली आहे. मुंबईत 3.39%, ठाण्यात 7.72%, तर सोलापूरसारख्या शहरांमध्ये तब्बल 10.17% वाढ झाली आहे. त्यामुळे घर खरेदी करणाऱ्यांवर मोठा आर्थिक भार पडणार आहे.
मुंबईत घर घेणं अजून कठीण
याआधीच मुंबईत घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. अशा परिस्थितीत रेडीरेकनर दरवाढीमुळे फ्लॅटच्या किमती आणखी वाढणार असून, सामान्य मुंबईकरांसाठी स्वतःचं घर घेणं आणखीनच अवघड होणार आहे.
तुमच्या शहरात किती वाढ?
- मुंबई: 3.39%
- ठाणे: 7.72%
- नवी मुंबई: 6.75%
- कल्याण-डोंबिवली: 5.84%
- मीरा-भाईंदर: 6.26%
- सोलापूर: 10.17%
राज्याच्या महसुलात बांधकाम क्षेत्राचा मोठा वाटा असल्यामुळे सरकारने दोन वर्षांनंतर पुन्हा दरवाढ केली आहे. मात्र, यामुळे घर खरेदी करणाऱ्यांना अधिक खर्च करावा लागणार आहे.रेडीरेकनर दर वाढल्याने स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन शुल्कही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे घर घेताना आर्थिक नियोजन अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.