हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातल्या निवडणुका (Lok Sabha Election 2024) आटोपल्या…आता सर्वांनाच ओढ लागलीय ती 4 जून च्या निकालाची…निवडणुकीतील प्रचार आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीचं वातावरण पाहता कुणाचे निवडून येण्याचे चान्सेस जास्त आहेत, याचा अंदाज आता समोर येऊ लागलाय. महायुतीत असणाऱ्या (Eknath Shinde) शिंदेंच्या शिवसेनेलाही 15 पैकी किती जागांवर यश मिळतय? याचा आकडा आता चर्चेत आलाय… शिंदेंनी लोकसभेत जोर लावलेल्या 15 जागा कोणत्या आहेत? आणि त्यातल्या कुठल्या जागांवर शिंदेंचे उमेदवार निवडून येतायत? तेच पाहुयात
पहिले उमेदवार आहेत श्रीकांत शिंदे… सलग दोन टर्म खासदार असणाऱ्या शिंदेच्या विरोधात ठाकरे टफ उमेदवार देतील अशी शक्यता होती. पण माजी नगरसेवक वैशाली दरेकर यांना मैदानात उतरवत ठाकरेंनी श्रीकांत शिंदेंना फ्री हिट दिलीय अशी मतदारसंघात चर्चा होती. पण प्रचारात दरेकरांनी घेतलेली आघाडी, भाजपच्या अंतर्गत नाराजीचा शिंदेंना बसलेला फटका आणि एकनिष्ठ विरुद्ध फुटीर हे मुद्दे फ्रंटला असल्याने दरेकर या रेसमध्ये आल्या.. मात्र श्रीकांत शिंदे अगदी निसटत्या लीडने कशीबशी कल्याणची जागा राखतील. अशी सध्या मतदारसंघात चर्चा आहे…दुसरे उमेदवार आहेत नरेश म्हस्के. शिंदेंच्या ठाण्याच्या बालेकिल्ल्यात आपल्या अत्यंत जवळच्या मावळ्याला शिंदेंनी मैदानात उतरवलं. ठाकरेंकडून राजन विचारे विरुद्ध नरेश म्हस्के यांच्या लढतीत राजन विचारे वन साईड मैदान मारतील, असं वातावरण प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच ठाण्यात होतं. नरेश म्हस्के यांना प्रचाराला मिळालेला अगदी थोडा थोडका वेळ, ठाकरेंच्या बाजूने असणारी सहानुभूतीची लाट आणि नरेश म्हस्के यांची उमेदवारी कनेक्ट न होण…या सगळ्या गोष्टी ठाकरेंच्या पथ्यावर पडताना दिसल्या. याशिवाय राजन विचारे यांचं मतदारसंघातील काम, मतदारांशी असणारा सुसंवाद आणि बंडाळीच्या वेळेस दाखवलेली निष्ठा यामुळे राजन विचारे मोठ्या लीडने निवडून येतील, अशी ठाण्यामध्ये चर्चा आहे…
तिसरे उमेदवार आहेत रवींद्र वायकर. मुंबई उत्तर पश्चिमच्या या इंटरेस्टिंग लढतीत ठाकरेंकडून अमोल कीर्तिकर विरुद्ध शिंदे गटाकडून रवींद्र वायकर मैदानात होते. वायकर हे ठाकरेंचे एकनिष्ठ…मात्र इडीने चक्र फिरवल्याने त्यांना नाईलाजाने शिंदेंसोबत जावं लागलं… पक्षप्रवेश होताना त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बरंच काही सांगत होते… त्यामुळे शिंदेंचा फोर्स असला तरी मशालीच्या विरोधात वायकर किती ताकद लावून लढतील, हा मोठा प्रश्नच होता. हे सगळं गणित पाहता अमोल कीर्तीकर यांचे मुंबई उत्तर पश्चिम मधून निवडून येण्याचे चान्सेस जास्त आहेत. चौथ्या उमेदवार आहेत यामिनी जाधव. ज्याला खरीखुरी मुंबई म्हटलं जातं त्या दक्षिण किंवा साउथ मुंबई मधून शिंदेंच्या यामिनी जाधव यांच्या विरोधात ठाकरे गटाचे स्टँडिंग खासदार अरविंद सावंत यांनी दंड थोपटले होते. राहुल नार्वेकर, मंगलप्रसाद लोढा यांनी यामिनी जाधव निवडून याव्यात, यासाठी बराच जोर लावला होता. पण मराठी विरुद्ध अमराठी, अरविंद सावंत यांनी केलेला आक्रमक प्रचार, इडीच्या कारवाईने यामिनी जाधव यांनी केलेली बंडखोरी, हे नरेटीव ठाकरे गटाने संपूर्ण प्रचारात वापरलं. मतदानानंतर इथेही ठाकरेंचे उमेदवार अरविंद सावंत निवडून येतील, अशी चर्चा आहे…
पाचवे उमेदवार आहेत राहुल शेवाळे. मुंबई दक्षिण मध्य मध्ये ठाकरे गटाकडून अनिल देसाई विरुद्ध शिंदेंकडून राहुल शेवाळे यांच्यातील झालेली ही अटीतटीची लढत. दोन टर्म खासदार राहिलेल्या राहुल शेवाळे यांना निवडून आणण्यासाठी शिंदेंनी आपली सारी यंत्रणा कामाला लावली होती. मात्र अनिल देसाईंच्या रूपाने ठाकरेंनी दिलेला कडवा प्रतिस्पर्धी इथं महत्त्वाचा फॅक्टर राहणार आहे. शेवाळेंच्या विरोधातील अँटी इन्कमबन्सी आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांचं मोठ केडर असल्याने इथे देसाईंचे निवडून येण्याचे चान्सेस जास्त आहेत…सहावे उमेदवार आहेत ते हेमंत गोडसे. नाशिकच्या राजाभाऊ वाजे विरुद्ध हेमंत गोडसे यांच्यातील लढतीकडे पुऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं. एक तर त्यांच्या उमेदवारीवरून बराच राडा झाला. त्यात गोडसे यांची मागील दोन टर्मची कारकीर्दही काही खास नव्हती. त्यात स्थानिक राजकारणात त्यांचा वाढता हस्तक्षेप यामुळेही त्यांना उमेदवारी देण्यात येऊ नये, असा महायुतीतून सुरू होता. हे सगळं सध्या राजाभाऊ वाजे यांच्या पथ्यावर पडताना दिसतय. ठाकरेंनीही इथे जोरात ताकद लावल्याने राजाभाऊ वाजे नाशिकात मशाल पेटवतील, असं मतदानानंतरचं वातावरण आहे.
सातवे उमेदवार आहेत श्रीरंग आप्पा बारणे. मावळमध्ये संजोग वाघेरे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे मावळमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली. बारणे तगडे उमेदवार असले तरी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा अंतर्गत विरोध इथे लपून राहिला नव्हता. अजित पवार गटाने आपला म्हणावा असा प्रचार केला नाही, अशी खंत स्वतः बारणेंनीही व्यक्त केली. वाघेरे हे तसे मूळचे अजितदादांचे कार्यकर्ते असल्याने इथल्या राष्ट्रवादीच्या केडरचा सपोर्ट हा ठाकरे गटाच्या बाजूने लागल्याचं बोललं जातं. त्यात अँटी इनकमबंसीचा फटका आणि ठाकरे आणि पवारांच्या बाजूने असणाऱ्या वातावरणाचा फायदा इथे वाघेरेंना झाला. थोडक्यात संजोग वाघेरे मावळात शिंदे गटाला अनपेक्षित धक्का देऊ शकतील…
आठवे उमेदवार आहेत धैर्यशील माने. हातकणंगलेत झालेल्या चौरंगी लढतीत आपली विद्यमान खासदारकी टिकवण्यासाठी मानेंना बरीच कसरत करावी लागली. राजू शेट्टींमुळे तयार झालेलं कडवं आव्हान आणि सत्यजित पाटील यांचा मतदारसंघावरचा होल्ड यामुळे इथे काटे की टक्कर होती. मानेंच्या प्रचारासाठी दस्तूरखुद्द पंतप्रधानांनी इथं जाहीर सभा घेतली होती. पण भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाचा मानेंना असणारा विरोध आणि आपल्या पहिल्या टर्ममध्ये अनेक स्थानिक नेत्यांशी बिघडलेले संबंध याचा फटका मानेंना निकालात बसू शकतो.. इथं सत्यजित पाटील आघाडी मिळवतील, अशी मतदारसंघात चर्चा आहे…नववे उमेदवार आहेत संजय मंडलिक. कोल्हापुरात काँग्रेसकडून शाहू छत्रपती यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. त्याच दिवशी शिंदे यांचे उमेदवार संजय मंडलिक बॅकफुटला गेले. कोल्हापूरच्या गादीबद्दल केलेली अनेक वादग्रस्त वक्तव्य मंडलिकांवरच बूमरँग होताना पाहायला मिळाली. मंडलिकांच्या बाजूने हसन मुश्रीफ, धनंजय महाडिक यांनी जोर लावला असला तरी सतेज पाटलांच्या जबरी नेटवर्कमुळे इथे मान आणि मत दोन्हीही गादीलाच! असं चित्र निवडणुकीनंतर दिसून येतय…
दहावे उमेदवार आहेत संदीपान भूमरे. अगदी बरीच काथ्याकूट झाल्यानंतर ठाकरेंच्या चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात शिंदेंनी संदिपान भुमरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. इम्तियाज जलील यांच्यामुळे छत्रपती संभाजी नगरची लढत ही तिरंगी आणि अटीतटीची असणार आहे. चंद्रकांत खैरे यांना महाविकास आघाडीची मिळालेली भक्कम साथ, प्रचारासाठी पिंजून काढलेला मतदारसंघ आणि शिवसेनेचे लोकप्रतिनिधी फूटले असले तरी कार्यकर्त्यांची निष्ठा यामुळे इथे चंद्रकांत खैरे निकालात लीडला असतील, असा अंदाज वर्तवला जातोय…अकरावे उमेदवार आहेत सदाशिव लोखंडे. अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिंदेंकडून सदाशिव लोखंडे विरुद्ध ठाकरेंकडून भाऊसाहेब वाकचौरे अशी इंटरेस्टिंग लढत झाली. वंचितकडून उत्कर्षा रूपवते इथं मैदानात उतरल्याने शिर्डीची लढत तिरंगी झाली. वंचितच्या उमेदवारीने वाकचौरे यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मतविभाजनाचा फटका आणि सदाशिवराव लोखंडे हे आपल्या विकासकामांच्या जोरावर निकालात लीडला राहतील, असं सध्या शिर्डीचं वातावरण आहे…
बारावे उमेदवार आहेत बाबुराव कदम कोहळीकर. खरंतर हिंगोलीसाठी ठाकरेंच्या नागेश पाटील अष्टीकर यांच्या विरोधात हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र ऐनवेळी त्यांची उमेदवारी मागे घेत कोहळीकरांना उमेदवारी देण्यात आली. कागदावर येथे महायुतीची ताकद जास्त दिसत असली तरी शेती प्रश्न, मराठा आरक्षण आणि महागाई हे फॅक्टर इथे ठाकरेंना साथ देऊ शकतात. अष्टीकरांनी प्रचारात लावलेली ताकद आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीचं वातावरण पाहता हिंगोलीत मशाल फिक्स आहे, असं बोललं जातंय…शिंदेंचे तेरावे उमेदवार आहेत राजू पारवे. रामटेक मतदार संघासाठी शिंदेंनी काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांची आयतवारी करून इथून काँग्रेसच्या श्यामकुमार बर्वे यांना फाईट दिली. रश्मी बर्वे यांच्या उमेदवारीवर इथे झालेला राडा सर्वांनीच पाहिला. रामटेक हा काँग्रेसचा मजबूत बालेकिल्ला असल्यानं आणि त्यातही अल्पसंख्यांकांचा व्होट शेअर मोठा असल्याने इथे काँग्रेसचं पारडं जड होतं. त्यात शिंदेंनी काँग्रेस मधून आयतवारी करून पारवेंना उमेदवारी देण्याचा निर्णय मतदारांना फारसा रुचला नाही. त्यामुळे इथे काँग्रेसचा पंजा चालणार अशी चर्चा आहे…
चौदावे उमेदवार आहेत प्रतापराव जाधव. बुलढाण्यात ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर, शिंदेंकडून प्रतापराव जाधव तर अपक्ष रविकांत तुपकर अशी लढत झाली. शिंदेंच्या प्रतापराव जाधव यांच्या विरोधात बुलढाण्यात अँटीइनकंबनसी होती. त्यात ठाकरे गटाकडून गद्दार विरुद्ध खुद्दार अशी प्रचाराची लाईन पुढे घेऊन गेल्यामुळे याचा मोठा फटका जाधवांना बसल्याचं बोललं जातंय. त्यामुळे इथे खरी लढत ठाकरे गट विरुद्ध रविकांत तुपकर अशी असल्याची मतदारांच्या चर्चा आहे. मत विभाजनाचा प्रॉपर गेम जुळून आला तर इथे अपक्ष म्हणून रविकांत तुपकर देखील आघाडी मारू शकतील…
आता या यादीतले शेवटचे म्हणजेच पंधरावे उमेदवार आहेत राजश्री पाटील. यवतमाळ वाशिममध्ये भावना गवळी यांचा पत्ता कट झाल्यानंतर ठाकरेंच्या संजय देशमुखांच्या विरोधात कडवा प्रतिस्पर्धी शोधण्याचा आव्हान होतं. मात्र अत्यंत नाट्यमयरित्या नागेश पाटील यांची हिंगोलीतील उमेदवारी रद्द करत त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ मधून उमेदवारी देण्यात आली. बाहेरचे उमेदवार त्यात गद्दारीचा लागलेला टॅग यामुळे संजय देशमुख निवडणूक प्रचारापासून ते प्रत्यक्ष मतदानापर्यंत प्लसमध्ये राहिले. महायुतीला इथे पाठिंबा असला तरी त्याचं मतांमध्ये कन्वर्जन करण्यात राजश्री पाटील यांना यश आलं नाही, अशी मतदारसंघात चर्चा आहे. त्यामुळे भावना गवळी यांच्यानंतर आता मशालीचा उजेड यवतमाळ वाशिमवर पडेल, अशी मतदारसंघात चर्चा आहे…
तर या होत्या शिंदे गट लढवत असणाऱ्या लोकसभेच्या 15 जागा. यापैकी सध्या तरी केवळ दोनच जागांवर शिंदेंचे उमेदवार निवडून येण्याचे चान्सेस दिसतायेत. मात्र प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी हा आकडा खालीवर होऊ शकतो. पण शिवसेनेत केलेल्या बंडाळीचा फटका शिंदेंना लोकसभेला बसताना दिसतोय, एवढं मात्र निश्चित…शिंदे गटाच्या 15 पैकी किती जागा निवडून येतील? तुमचा आकडा कमेंट करून नक्की सांगा.