कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (EPFO) ट्रस्टी बोर्डाच्या बैठकीत कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. FY 2025-26 मध्येही EPF वर 8.25% व्याज दर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याच्या सर्व बचत योजनांच्या तुलनेत पीएफवर सर्वाधिक व्याज मिळणार आहे.
केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी ही बैठक पार पडली. बैठकीत EPF जमा रकमेवर 8.25% वार्षिक व्याज देण्याची शिफारस करण्यात आली असून, केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी होताच EPFO सदस्यांच्या खात्यात हे व्याज जमा करण्यात येईल.
पीएफवर सर्वाधिक व्याज
गेल्या काही दिवसांपासून पीएफवरील व्याज दर कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, सरकारने व्याज दर कायम ठेवत कर्मचारी वर्गाला मोठा दिलासा दिला आहे. 2024 मध्येही हाच दर लागू होता. तुलनात्मक पाहता, सध्या EPF वर सर्वाधिक 8.25% व्याज मिळत आहे.
पब्लिक प्रोविडंट फंड (PPF) – 7.1%
पोस्ट ऑफिस 5 वर्ष ठेवीवर – 7.5%
किसान विकास पत्र – 7.5%
टर्म डिपॉझिट (3 वर्षे) – 7.1%
वरिष्ठ नागरिक बचत योजना आणि सुकन्या समृद्धी योजना – 8.2%
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) – 7.7%
पोस्ट ऑफिस बचत खाते – फक्त 4%
या सर्व योजनांपेक्षा EPF व्याजदर अधिक असल्याने कर्मचारी आणि कामगारांसाठी ही गुंतवणूक सर्वात फायदेशीर ठरत आहे.
EDLI योजनेत मोठा बदल – दोन नोकऱ्यांतील गॅप चालणार, कुटुंबांना संरक्षण
EPFOच्या कर्मचारी जमा लिंक्ड विमा योजना (EDLI) मध्येही मोठे बदल करण्यात आले आहेत. याअंतर्गत,जर कोणत्याही कर्मचारी सदस्याचा मृत्यू एका वर्षाच्या नियमित नोकरीपूर्वी झाला, तरीही त्याच्या कुटुंबाला 50 हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळेल. या निर्णयामुळे सुमारे 5 हजार कुटुंबांना थेट फायदा होणार आहे. दोन नोकऱ्यांमधील गॅप आता अडथळा ठरणार नाही.
एखाद्या कर्मचाऱ्याने एक नोकरी सोडून दुसरी नोकरी स्वीकारेपर्यंत 2 महिन्यांचा ब्रेक असेल, तरी त्याची सेवा नियमित समजली जाईल.
यामुळे अशा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास, त्यांच्या कुटुंबाला EDLI अंतर्गत किमान 2.5 लाख आणि जास्तीत जास्त 7 लाख रुपयांपर्यंतचा विमा संरक्षण लाभ मिळू शकेल. पूर्वी दोन नोकऱ्यांमध्ये काही दिवसांचा ब्रेक पडल्यास ही सततची सेवा मानली जात नव्हती आणि त्यामुळे EDLI योजनेचा लाभही मिळत नव्हता.
या निर्णयामुळे एकूण 1,000 हून अधिक कुटुंबांना दरवर्षी फायदा मिळणार आहे.
6 महिन्यांच्या आत मृत्यू – तरीही विमा संरक्षण मिळणार
- अंतिम पीएफ योगदानाच्या 6 महिन्यांच्या आत जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तरी त्याला EDLI संरक्षण मिळणार आहे, फक्त त्याचे नाव कंपनीच्या रोलवर असणे गरजेचे आहे.
- या सवलतीमुळे तब्बल 14 हजार कुटुंबांना दरवर्षी फायदा मिळेल.
- एकूण 20 हजार कुटुंबांना दरवर्षी फायदा
- या सर्व निर्णयांमुळे दरवर्षी सुमारे 20 हजार कुटुंबांना आर्थिक सुरक्षा मिळणार आहे. कर्मचारी वर्गासाठी हा मोठा दिलासा आहे.
- EPFOने कामगारांच्या हक्कांसाठी मोठे पाऊल उचलले असून, नोकरीदरम्यान आणि नोकरी संपल्यानंतरही कुटुंबांना विमा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे.