तुमचे बँक खाते नसेल तर 2000 च्या नोटा कशा बदलणार? महत्वाची माहिती पहाच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI ने कालच 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घोषित केल्यानंतर सर्वसामान्य जनतेत काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते कारण आजवर त्यांनी कष्टाने जमवलेल्या नोटा जर चलनातून बाद करण्यात आल्या तर हाती काहीच उरणार नाही. ज्यांचे बँक खाते आहे त्यांना 2000 रुपयांच्या नोटा बँकेतून बदलण्याचा पर्याय उपलब्ध आहे पण ज्यांनी अजून बँकेची पायरीही चढली नाही पण कमावलेल्या पैश्यांची घरच्या घरीच बचत केली आहेअश्या लोकांमध्ये सध्या संभ्रमाची स्थिती उपस्थित झाली आहे. हा लेख त्यांना योग्य ते मार्गदर्शन करेल यांत शंका नाही .

नोटाबंदीनंतर चलनात आलेल्या 2000 रुपयांच्या नोटा टप्प्या – टप्प्याने बंद केल्या जात आहेत. 2016 च्या नोटाबंदीप्रमाणे ते ताबडतोब चलनातून बाहेर काढले गेले नसले तरी बँकांमध्ये त्यांचे वितरण थांबवण्यात आले आहे. यामुळे सर्वसामान्य लोक व्यवहारात 2000 च्या नोटा घेताना टाळाटाळ करत आहेत. सामान्य लोकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा खूपच कमी प्रमाणात चलनात असून रिझर्व्ह बँकेच्या या आदेशानंतर सर्वसामान्यांच्या मनात 2000 रुपयांच्या नोटांबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

ज्यांच्याकडे आताच्या घडीला 2000 रुपयांच्या नोटा आहेत त्यांनी त्या नोटा बँकेत जमा करण्याचे RBI ने आदेश दिले आहेत. पण ज्यांच्याकडे बँक खाते नसेल त्यांनी घाबरण्याची गरज नाही. कोणतीही व्यक्ती बँकेतून 20 हजार रुपयांपर्यंतच्या नोटा बदलू शकते. सामान्य माणूस 30 सप्टेंबरपर्यंत व्यवहारासाठी 2000 ची नोट वापरू शकतो. 23 मे 2023 पासून तुम्ही बँकेत जाऊन 2000 ची नोट बदलून घेऊ शकता. बँकेने नोट बदलून देण्यास नकार दिल्यास, तुम्हाला थेट बँक अधिकाऱ्याशी संपर्क साधावा लागेल. जर बँक अधिकारी 30 दिवसांच्या आत उत्तर देत नसेल तर, बँकिंग लोकपालकडे त्वरित तक्रार करा. तुम्ही RBI च्या वेबसाईटवर जाऊन देखील तक्रार करू शकता.

दोन हजार रुपयांची नोट हि आरबीआय कायदा 1934 च्या कलम 24 (1) अंतर्गत चलनात आणण्यात आली होती. जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर व्यवहारात चलनाचा तुटवडा झाल्याने या नोटा चलनात आणण्यात आल्या होत्या. नंतर इतर नोटा बाजारात उपलब्ध झाल्यानंतर 2000 रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचा उद्देश सफल झाला होता . त्यामुळे 2018-19 मध्ये 2,000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती. तेव्हा आता तुम्ही तुमच्याकडे असलेल्या 2000 रुपयांच्या नोटांची काळजी करण्याची काहीच गरज नसून घराजवळ असलेल्या बँकेत जाऊन त्या बदली करून घ्या.