हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज 26 डिसेंबर म्हणजेच दत्तात्रेय जयंती होय. दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला भगवान दत्तात्रेयांची जयंती साजरी केली जाते. असे म्हणतात की, याच दिवशी भगवान ब्रह्मा, भगवान विष्णू आणि भगवान शिव दत्तात्रेय रुपात अवतरले होते. त्यामुळे आजच्या दिवशी दत्तात्रेय देवाची उपासना केल्यास ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तिघांची कृपा आपल्यावर होते. परंतु तुम्हाला दत्तात्रेय देवाचा जन्म कसा झाला हे माहीत आहे का?नसेल तर ही पौराणिक कथा नक्की वाचा.
पौराणिकतेनुसार, संपूर्ण विश्वामध्ये महर्षी अत्रि मुनींची पत्नी अनुसूया हिच्या पतिव्रतेचे कौतुक होत असल्यामुळे देवी सती, देवी लक्ष्मी आणि देवी सरस्वती यांनी आपल्या पतींना म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि शंकर यांना अनुसूयाची परीक्षा घेण्यास सांगितले. त्यामुळेच या तिन्ही देवांनी ऋषींचा वेश धारण करून अनुसूयाची परीक्षा घेण्यासाठी आश्रमात आले. या तिघांना देखील अनुसूयाने भिक्षा आणली. परंतु त्यांनी ती स्वीकारली नाही.
त्रिमुर्ती म्हणाले की, आम्हाला अन्न खाण्याची इच्छा आहे. त्यामुळे आम्हाला तू भिक्षा न देता जेवायला घालावे. याला अनुसुयाने सहमती दिली. परंतु पुढे, या त्रिमूर्तींनी अनुसुया यांना नग्नावस्थेत भोजन देण्यास सांगितले. यावर देवी अनुसुया क्रोधित झाली आणि तिला तिच्या दिव्य दृष्टीतून या त्रिमूर्ती मागील सत्य समजले. या गोष्टीचा पश्चाताप झाल्यामुळे अनुसुया देवीने तिन्ही ऋषींना बाळांमध्ये रूपांतरित करून आपल्याजवळ ठेवले. त्यांची काळजी घेतली. त्यांना भोजन दिले.
परंतु इकडे पतीपासून विभक्त झाल्यामुळे तिने देवांच्या पत्नी दुःखी झाल्या. मग त्यांनी धरतीवर येऊन अनुसूयाची माफी मागितली आणि त्रिमूर्ती आम्हाला परत करावे अशी विनंती केली. या विनंतीवरच अनुसूयाने त्रिमूर्तीचे रूप परत केले. यानंतर त्रिमुर्तींनी अनुसूयाला आशीर्वाद दिला की, ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचा एकच अंश तुझ्या गर्भातून जन्माला येईल. यानंतर अनुसूयाने दत्तात्रेयांना जन्म दिला. त्या बाळाचे नाव दत्त असे ठेवले.