हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (HUF Benefits) नवे आर्थिक वर्ष म्हटले कि, आयटी रिटर्न्स दाखल करणं आलंच. तुम्हीसुद्धा रिटर्न्स भरत असाल तर तुम्हाला माहित असेल की, येत्या ३१ जुलै २०२४ पर्यंतच आयकर विवरणपत्र भरायचे आहे. दरम्यान ITR भरताना प्रत्येक करदात्याचा प्रयत्न असतो की, काही करून टॅक्स वाचवावा. अशातच हिंदू कुटुंबांना आयकर कायद्यात स्वतंत्र सूट देण्यात आल्याचे समजत आहे. ज्याच्या माध्यमातून हिंदू कुटुंब लाखो रुपयांची कर बचत करू शकतील.
न केवळ हिंदू, तर जैन, शीख कुटुंब कायदेशीर मार्गाने पूर्ण वार्षिक उत्पन्न दाखवून HUF अर्थात हिंदू अविभक्त कुटुंबाद्वारे कर वाचवू शकणार आहात. आता HUF म्हणजे नक्की काय? आणि यामुळे कर कसा वाचतो? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर चिंता करू नका. याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया.
HUF म्हणजे काय? (HUF Benefits)
संपूर्ण देशभरात आयकर कायद्यामध्ये हिंदू अविभक्त कुटुंबांसाठी एक वेगळी तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीअंतर्गत कोणतेही हिंदू कुटुंब HUF खाते उघडू शकते. या खात्यातून केले जाणारे व्यवहार आणि होणारी कमाई स्वतंत्र व्यक्तीसाठी असल्याचे मानले जाते. ज्यामुळे HUF करदात्याला – ८०सी, दीर्घकालीन भांडवली नफा किंवा २.५ लाख रुपयांची मूळ सूट असलेल्या कर सवलतींचा लाभ घेता येतो.
कसा लाभ घ्याल?
HUF खात्याचा फायदा हा केवळ हिंदू कुटुंबांना दिला जातो. मात्र हा लाभ कसा घ्यायचा हे आपल्याला माहित हवे. यासाठी हिंदू कुटुंबांना वेगळा पॅन बनवावा लागतो. ज्याद्वारे फायनान्सशी संबंधित सर्व कामे करणे अनिवार्य असते. तसेच HUF अंतर्गत कुटुंबाचा प्रमुख हा कर्ता तर बाकीचे सर्व त्याचे सदस्य मानले जातात. (HUF Benefits) त्यामुळे जन्म किंवा लग्नानंतर दुसरी व्यक्ती कुटुंबात सामील झाल्यास तीला सुद्धा HUF अंतर्गत सदस्य मान्यता मिळते. यानुसार, तुम्ही संपूर्ण एक कुटुंब मिळून १ व्यक्ती म्हणून HUF खात्याअंतर्गत गुंतवणूक करून कर सवलतींचा लाभ घेऊ शकाल.
HUF अंतर्गत अशी मिळेल कर सूट
HUF अंतर्गत केवळ हिंदू कुटुंबांना कर सुटीचा लाभ घेता येतो. यात आयकर कायद्याच्या कलम ८०सी अंतर्गत जीवन विमा, FD, PPF, लहान बचत योजना, गृहकर्ज आणि ELSS मध्ये केलेल्या गुंतवणुकीद्वारे १.५ लाख रुपयांपर्यंत कर सुटीचा दावा करता येतो. (HUF Benefits) तर कलम 80DD अंतर्गत, हिंदू कुटुंबाच्या आरोग्य विम्याच्या प्रीमियमवर २५ हजार आणि ज्येष्ठ पालकांच्या आरोग्य विम्याच्या प्रीमियमवर ५० हजार रुपयांच्या कर सुटीचा दावा करता येतो. याशिवाय HUF खात्याअंतर्गत घर खरेदी केल्यास त्याच्या व्याजावर कलम 24B अंतर्गत २ लाख रुपयांची कर सूट दिली जाते.