औरंगाबाद | मे महिन्याच्या पहिल्या सत्रात सहामाही परीक्षा झाल्या नंतर दोन महिने संपताच 29 जुलै पासून दुसऱ्या सत्रातील सहामाही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. परंतु अभ्यासक्रम किती पूर्ण झाला याकडे लक्ष न देता परीक्षा घेण्यात येत आहे. बीए, बीएस्सी, बीकॉम या पारंपरिक पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय व तृतीय वर्षांच्या परीक्षा 29 जुलैपासून सुरू होणार असून 10 ऑगस्टपासून प्रथम वर्षाच्या परीक्षा सुरू होणार आहेत. त्याचबरोबर सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा 17 ऑगस्ट आणि 20 ऑगस्टपासून अभियांत्रिकी, फार्मसी, विधी या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
कोरोना महामारीमुळे 2 वर्षांपासून शाळा महाविद्यालय बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण घेण्याचे प्राध्यापकांचे आदेश आहे परंतु ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या असल्यामुळे विद्यार्थ्यांना लेक्चर करता येत नाही. त्याचबरोबर काही मोठ्या संस्थांची महाविद्यालये सोडली, तर अनेक महाविद्यालये व विद्यापीठातील काही विभागांच्या तासिका कागदावरच दाखविल्या जातात. परंतु अभ्यासक्रम पूर्ण झालेला नसताना विद्यापीठाने परीक्षांची घाई केलेली आहे. असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
गेल्या वर्षापासून कोरोनामुळे शैक्षणिक क्षेत्र विस्कळीत झाले आहेत. महाविद्यालयांचे संपूर्ण वेळापत्रक कोरोना महामारीमूळे विस्कळीत झाले आहे. ते पूर्वपदावर आणण्यासाठी विद्यापीठा मार्फत परीक्षा वेळेवर घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महाविद्यालये बंद असल्यामुळे ऑनलाइन लेक्चर घेतले जात आहेत. प्राध्यापकांनी घेतलेल्या या क्लासची पडताळणी केली जाते. या क्लासमध्ये सहभागी विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जाते. अशी माहिती प्राध्यापकांनी केली आहे.